Breaking : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रातील ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Breaking : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रातील ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

निवडणूक आयोगाकडून घोषणा; २९ सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमधील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार महाराष्ट्रातील पदवीधरच्या ३ आणि शिक्षक मतदारसंघाच्या २ अशा एकूण ५ जागांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान पार पडणार असून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील निवृत्त होणारे सदस्य आणि मतदारसंघ :
महाराष्ट्रातील पाच विधानपरिषद सदस्यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे. यामध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून सतीश भानुदासराव चव्हाण, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अरुण गणपती लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून किरण रामराव सरनाईक आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत दिनकर आसगावकर या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या सर्व जागांसाठी आता नवी निवडणूक होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम :
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, निवडणुकीची अधिकृत अधिसूचना २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर २०२६ असणार आहे. दाखल अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होईल, तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० ते दुपारी ४:०० या वेळेत मतदान होईल आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडून निकाल जाहीर करण्यात येतील. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

Shree clinic

चार राज्यांमध्ये रणधुमाळी :
या निवडणुकीअंतर्गत देशभरातील एकूण २८ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये बिहारमधील ८ (४ पदवीधर आणि ४ शिक्षक), कर्नाटकातील ४ (२ पदवीधर आणि २ शिक्षक), महाराष्ट्रातील ५ (३ पदवीधर आणि २ शिक्षक) तसेच उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ११ जागांचा (५ पदवीधर आणि ६ शिक्षक) समावेश आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता शिक्षक आणि पदवीधर मतदारांमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग येणार आहे.