तक्षशिला ग्रामीण पतसंस्थेचे एकूण व्यवहार २८ कोटींवर; ठेवींनी ओलांडला २१ कोटींचा टप्पा

तक्षशिला ग्रामीण पतसंस्थेचे एकूण व्यवहार २८ कोटींवर; ठेवींनी ओलांडला २१ कोटींचा टप्पा

२८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पाली येथे उत्साहात संपन्न; सलग ‘अ’ वर्ग राखल्याबद्दल सभासदांकडून समाधान

रत्नागिरी / पाली : सभासदांचा दृढ विश्वास, संचालक मंडळाचे योग्य नियोजन आणि कर्मचारीवर्गाच्या प्रामाणिक योगदानातून तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने आर्थिक प्रगतीची घोडदौड कायम राखली आहे. संस्थेचे एकूण व्यवहार २८ कोटी रुपयांवर पोहोचले असून ठेवींनी २१ कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. सहकार विभागाच्या नियमांनुसार आवश्यक असणारी ३० टक्के तरलता राखण्यासोबतच सुरक्षित कर्जवाटप व आर्थिक शिस्तीच्या जोरावर संस्थेने सलग ‘अ’ वर्ग प्राप्त केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन रामा कांबळे यांनी दिली. श्री मंगल कार्यालय, पाली येथे आयोजित संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

वार्षिक सभेचे उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात आयोजन :

सभेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला. अहवाल सालात निधन झालेल्या संस्थेच्या सभासदांना या वेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेस उपस्थित सर्व सभासदांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या सभेला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, पंचायत समिती सदस्य डॉ. पद्मजा कांबळे, आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कारप्राप्त आशिष खोचाडे, संस्थेचे माजी अध्यक्ष अजित कांबळे यांच्यासह सौ. निलम जाधव, प्रकाश सावंत, विद्याधर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे व सभासदकेंद्रित वाटचालीचे विशेष कौतुक केले.

Vinayka motars

आदर्श आर्थिक निकष आणि लाभांश जाहीर :

अध्यक्षीय भाषणात नितीन कांबळे यांनी सांगितले की, सहकार विभागाच्या निकषांनुसार संस्थेने सी.डी. रेशो, सीआरआर, एसएलआर, सीआरएआर आणि एबीआर यांचे आदर्श प्रमाण राखले आहे. कर्जदारांना सुरक्षिततेसाठी विमा कवच देण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. संस्थेची ही आर्थिक भरभराट सभासदांच्या विश्वासाचे प्रतीक असून त्याचा लाभ थेट सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वेळी लाभांश जाहीर करण्यात आला. भागभांडवल वाढीसाठी सभासदांनी जास्तीत जास्त शेअर्स संस्थेत ठेवावेत, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

गुणवंत सभासद व आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव :

पतसंस्थेच्या वतीने सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचा दरवर्षी दिला जाणारा ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार २०२५-२६’ यावेळी प्रदान करण्यात आला.

संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची उपस्थिती :

या सभेला उपाध्यक्ष अमोल केशव सावंत, संचालक दत्ताराम घडशी, कृणाल सरफरे, पराग पालकर, गणपत सनगरे, संदिप पाटील, सुरेश सावंत, सुमित रणसे, सौ. वैभवी सावंत, सौ. स्नेहा गराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण गुरव, शाखा व्यवस्थापक तसेच कर्मचारीवृंद आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक चर्चेमुळे ही वार्षिक सभा उत्साहात पार पडली.