Pachal Burglary Case: गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्याचे घर फोडले; ६.५ लाखांचा ऐवज लांबवला

Pachal Burglary Case: गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्याचे घर फोडले; ६.५ लाखांचा ऐवज लांबवला

राजापूर तालुक्यातील विद्यानगर येथे अज्ञात चोरट्यांचा डल्ला; पोलीस पथकांकडून फॉरेन्सिक आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू

पाचल घरफोडी प्रकरण उघडकीस आल्याने राजापूर तालुक्यातील विद्यानगर परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गणपती सुट्टीच्या कालावधीत घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पाचल-विद्यानगर येथील एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे व तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ६ लाख ५० हजार १८५ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची ही घटना घडली आहे.

पाचल येथील सरस्वती विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सन्नू पिरजादे आणि त्यांचे पती मुसाअल्ली गुलाब पिरजादे (वय ५६, मुख्याध्यापक, तुळसवडे हायस्कूल) हे दाम्पत्य गणपती सुट्टीनिमित्त १२ सप्टेंबर रोजी आपल्या मूळ गावी गेले होते. पिरजादे दाम्पत्य मूळ गावी असतानाच त्यांच्या पाचल-विद्यानगर येथील बंद निवासस्थानाला चोरट्याने लक्ष्य केले.

अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा एखाद्या हत्याराच्या सहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. यानंतर घरातील लोखंडी व लाकडी कपाटांचे दरवाजे आणि तिजोरी उघडून ऐवज लंपास केला. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे घडण, सोन्याचे ब्रेसलेट, डायमंड मंगळसूत्र, डायमंडचे कानातील टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे कानातले, सोन्याचा हार, कलर स्टोन्स नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या पैंजणाचा जोड आणि १२ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. घरातील मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिरजादे कुटुंबीयांनी तत्काळ राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

Ronic

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(क), ३३१(३) व ३३१(४) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद घराची रेकी करून ही चोरी करण्यात आल्याचा संशय असून, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.