अजित पवार अपघात प्रकरण: AAIB कडून महिन्याभरात तपास अहवाल मिळण्याचे आश्वासन; उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या हेमंत पाटील यांची माहिती

अजित पवार अपघात प्रकरण: AAIB कडून महिन्याभरात तपास अहवाल मिळण्याचे आश्वासन; उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या हेमंत पाटील यांची माहिती

बारामती विमानतळावरील विमान अपघाताच्या चौकशीबाबत ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या तक्रारीनंतर एएआयबी महासंचालकांची भेट

अजित पवार अपघात प्रकरण संदर्भातील चौकशी अहवाल येत्या एका महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या एनजीओचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ‘विमान अपघात तपास यंत्रणेने’ (AAIB) ही माहिती दिली आहे. या प्रकरणी एएआयबीच्या महासंचालकांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर महिन्याभरात अपघाताबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांचे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हा अपघात होता की घातपात, असा सवाल उपस्थित करत विविध शंका व्यक्त केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर हेमंत पाटील यांनी प्रारंभी बारामती येथे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून दखल न घेतली गेल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास एएआयबी (AAIB) करत असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पाटील यांनी जून महिन्यात या केंद्रीय तपास यंत्रणेकडे अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीवर प्रदीर्घ काळ उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी आज थेट एएआयबीच्या कार्यालयात जाऊन महासंचालकांची (DG) भेट घेतली. या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी पुढील एका महिन्यात तपास पूर्ण करून अंतिम अहवाल जाहीर केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Shanti 3

दरम्यान, अजित पवार यांचा हा अपघात नसून घातपात असावा, असा संशय पाटील यांनी आपल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे. जर दिलेल्या मुदतीत म्हणजेच एका महिन्यात एएआयबीने आपला अहवाल सार्वजनिक केला नाही, तर या प्रकरणासंदर्भात पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशाराही हेमंत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता आगामी महिन्यात येणाऱ्या या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.