Ratnagiri Market Boom: गणेशोत्सवाने रत्नागिरीच्या बाजारपेठेला आर्थिक बूस्टर डोस!

Ratnagiri Market Boom: गणेशोत्सवाने रत्नागिरीच्या बाजारपेठेला आर्थिक बूस्टर डोस!

कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि स्थानिक व्यवसायांना आर्थिक आधार

Ratnagiri Market Boom: श्री गणरायाच्या आगमनाने रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्साह पाहायला मिळाला असून, गणेशोत्सवाच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. गणेशमूर्ती, आरास-पूजा साहित्य, मिठाई, कपडे, फुले-फळे तसेच विद्युत रोषणाईच्या वस्तूंच्या विक्रीतून लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी बाजारातील मंदीची झळ या खरेदीमुळे काही प्रमाणात दूर झाली आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, पुण्यासह इतर विविध शहरांमधून लाखांच्या संख्येने चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल झाले होते. यामुळे जिल्ह्यातील रत्नागिरी शहरासह स्थानिक बाजारपेठा पूर्णपणे गजबजून गेल्या होत्या. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता कोकणच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारा मुख्य घटक ठरला आहे.

यावर्षी गणेशोत्सवा दरम्यान पावसाचा अडथळा तुलनेने कमी राहिल्याने नागरिकांनी उत्साहाने खरेदीसाठी बाहेर पडणे पसंत केले. जिल्ह्यात एकूण १ लाख ६६ हजार ५८७ घरगुती, तर ९१० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. नागरिकांनी घरगुती गणेशोत्सवासाठी मखर, सजावटीचे साहित्य, लाईटिंग माळा, पूजेचे साहित्य, नवीन कपडे, फळे व मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

Amey jwelrs

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही मंडप उभारणी, देखावे, विद्युत रोषणाई, सजावट आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. या माध्यमातून मंडप व्यावसायिक, डेकोरेटर्स, इलेक्ट्रिशियन, कलाकार, फुल विक्रेते आणि इतर सेवा पुरवठादारांना मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

गणेशोत्सवाच्या या काळात मखर व आरास साहित्य, पूजा साहित्य, मिठाई, कपडे, फुले-फळे आणि लाईटिंगच्या व्यवसायांना मोठी झळाळी मिळाली. प्रत्येक कुटुंबाने आणि मंडळांनी आपल्या परीने खर्च केल्यामुळे थेट स्थानिक व्यापाऱ्यांना याचा लाभ झाला. गणेशोत्सवामुळे रत्नागिरीच्या बाजारपेठेत निर्माण झालेली ही प्रचंड आर्थिक हालचाल स्थानिक व्यावसायिक आणि दुकानदारांसाठी अत्यंत दिलासादायक ठरली आहे.