निवेंडी आणि तळेकरवाडी येथे आंबा-काजू प्रक्रिया उद्योगाला गती; एमआयडीसीकडून १२५ कोटींचा निधी महसूल विभागाकडे वर्ग
रत्नागिरी:
मँगो कॅश्यू पार्क प्रकल्पासाठी रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी आणि तळेकरवाडी येथे पार पडलेल्या भूसंपादन प्रक्रियेतील बाधित खातेदारांना जमिनीचा मोबदला वाटप करण्यास गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अधिकृत सुरुवात झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेंडी व तळेकरवाडी येथील पाच खातेदारांना नऊ खात्यांसाठी सुमारे १५ कोटी रुपयांच्या मोबदल्याचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. सुमारे ९७ हेक्टर जागेच्या संपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १२० कोटी रुपये महसूल विभागाला प्राप्त झाले असून, प्रत्यक्ष मोबदला वाटपाचा शुभारंभ झाल्याने स्थानिक शेतकरी व खातेदारांना दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन दक्षिण कोकण जिल्ह्यांतील आंबा व काजू उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने निवेंडी आणि तळेकरवाडी येथे या विशेष पार्कची उभारणी केली जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. यासाठी सुरुवातीला १०० हेक्टर जागा अधिग्रहित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते; त्यापैकी ९७ हेक्टर जमिनीचे संपादन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
या ठिकाणी भव्य प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास केवळ आंबा आणि काजूच नव्हे, तर फणस, करवंद आणि जांभूळ यांसारख्या स्थानिक फळांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना मोठा वाव मिळणार आहे. यामुळे कोकणातील पारंपरिक फळशेतीला मोठी आर्थिक स्थिरता प्राप्त होणार असून, स्थानिक रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

भौगोलिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने निवेंडी येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्प अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. या जागेपासून रत्नागिरी रेल्वे स्टेशन तसेच प्रस्तावित विमानतळ सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय जयगड बंदर १५ ते २० किलोमीटर अंतरावर असून मुख्य महामार्गही जवळ असल्याने कच्च्या आणि पक्क्या मालाच्या वाहतुकीसाठी ही जागा उद्योगांसाठी अत्यंत पूरक ठरणार आहे.
मागील दोन वर्षांपासून ही भूसंपादन प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेत आलेल्या अनेक प्रशासकीय व स्थानिक अडचणींवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः चर्चा करून मार्ग काढला, तर रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी विविध बैठका घेऊन जमीन मालकांशी समन्वय साधला. एमआयडीसीने दोन टप्प्यांत उपलब्ध करून दिलेले १२० कोटी रुपये महसूल विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर आता पात्र खातेदारांच्या खात्यावर पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या धनादेश वाटप प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह महसूल व एमआयडीसीचे विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.













