स्मार्ट शेती, सौरऊर्जा, ईव्ही चार्जिंग, जलसंधारण, पर्यटन आणि रोबोटिक आरोग्यसेवेवर आधारित संकल्पना; संगमेश्वर तालुक्यातील २९ देखाव्यांमधून धामापूरकरांचा दूरदृष्टीचा उपक्रम
Ganesh Dekhava Dhamapur संकल्पनेच्या माध्यमातून गणेशोत्सवातील देखावे म्हणजे केवळ मनोरंजन आणि धार्मिक सजावट, अशी पारंपरिक कल्पना बाजूला ठेवत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामापूर ग्रामस्थांनी ‘२०४७ चे विकसित धामापूर’ ही संकल्पना प्रत्यक्ष देखाव्यातून मांडली आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रसाद देवस्थळी यांच्या संकल्पनेतून ही देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली. पुढील २१ वर्षांनंतर धामापूर कसे असावे, याचा विचार ग्रामस्थांनी करून त्याचे प्रारूप देखाव्यांमधून साकारले आहे.
दुबईतील ‘म्युझियम ऑफ द फ्युचर’च्या धर्तीवर भविष्यातील गावाची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. स्मार्ट शेतीपासून सौरऊर्जेपर्यंत धामापूरच्या धनावडेवाडी, पडेवाडी, ढोपारखोलवाडी, तांबडवाडी, गुरववाडी, भडवळेवाडी, गोवळवाडी, रामनवाडी, घारेवाडी, भेलेवाडी व भुसेवाडी आदी वाड्यांतील ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
काही देखाव्यांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने शेती, आधुनिक लागवड व रोबोटिक्सचा वापर यावर भर देण्यात आला आहे. पर्जन्य जलसंधारण, बोअरवेल पुनर्भरण व सौरऊर्जेच्या माध्यमातून ‘पाणीदार व ऊर्जास्वयंपूर्ण धामापूर’ची संकल्पना मांडण्यात आली आहे. भविष्यातील वाहतुकीसाठी गावात ईव्ही चार्जिंग स्टेशनचे जाळे व आधुनिक दळणवळण व्यवस्था उभारण्याची संकल्पना देखाव्यांमधून मांडली आहे.

धामापूरमधील ऐतिहासिक अवशेषांचे जतन करताना परिसरातील दोन धबधब्यांचा विकास करून पर्यटनाला चालना देण्याची कल्पना ग्रामस्थांनी मांडली. मत्स्यशेतीसोबत पर्यावरणपूरक जलपर्यटन विकसित करण्याचा विचारही काही देखाव्यांत केला आहे. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मोबाईल नेटवर्क, टेली-मेडिसिन व रोबोटिक आरोग्य सुविधा यांचा वापर करण्याची संकल्पना मांडण्यात आली. कृषी व पशुसंवर्धनावर आधारित उद्योग उभारून स्थानिक तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.
नवसरी देवीचे मानकरी अनिल भिंडे गावकर, कीर्तिराज सागवेकर, सचिन गुरव, मुकेश पड्ये, लखू महाकाळ, निलेश गुरव, दीपक बेंडके व माजी सरपंच शांताराम मायजे यांनी ग्रामस्थांना या उपक्रमासाठी प्रोत्साहित केले. प्रदिप धनावडे, राज धनावडे, विशाल धनावडे, रमेश धनावडे, संचित पड्ये, मुकुंद पड्ये, रोहित बोले, सूरज भिंडे, नितीन पवार, ऋषिकेश रामाणे, रोशन रामाणे, स्वप्नील मायजे, शौर्य गिजये, रोशन मायजे, शिवराम मायजे, सुजय रामाणे, श्रीतेजन रामाणे, रवींद्र चव्हाण, अजय गुरव, अनिता महाडीक, आयुष देवरुखकर, सचिन चव्हाण, विद्याधर गावडे, रुपेश कांबळे, रोशन धामणाक, राहुल महाडीक, महेश गोरे, वल्लरी देवस्थळी आदींनी हे देखावे साकारले आहेत. प्रा. आदिती कोकजे यांनी या देखाव्यांचे परीक्षण केले. उत्कृष्ट देखाव्यांची निवड करून सुमारे ५१ हजार रुपयांची बक्षीसे देऊन सहभागींचा गौरव करण्यात येणार आहे.













