मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पिअर क्रमांक ३ जवळील घटना; अपघातानंतर कारचालक फरार, लांजा पोलिसांत गुन्हा दाखल
Lanja Highway Accident प्रकरणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहर उड्डाणपुलावर एक भीषण अपघात घडला आहे. उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करत असलेल्या एका मजुराला भरधाव महिंद्रा कारने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावरील पिअर क्रमांक ३ जवळ घडली. गोपाल मुरमु (वय ४५, रा. द्वारहट्टा, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) असे या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या मजुराचे नाव आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम ‘सीमा इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमार्फत सुरू आहे. प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांच्या देखरेखीखाली गोपाल मुरमु हे उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करत होते. त्याच वेळी मौला कासम शेख (वय ३८, मूळ रा. अक्कलकोट, सोलापूर; सध्या रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) हा त्याच्या महिंद्रा कारने (क्रमांक KA 03 AC 3600) उड्डाणपुलावरून अतिवेगाने जात होता. रस्त्यावरील काम आणि सुरक्षेचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवून निष्काळजीपणे वाहन चालवत त्याने मुरमु यांना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे गोपाल मुरमु यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता अथवा पोलिसांना घटनेची माहिती न देता तिथून पलायन केले.

या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कारचालक मौला कासम शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून सखोल पाहणी केली असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ३५(३) अन्वये आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे.
लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













