१० ऑक्टोबरपर्यंत राज्यभरातून मान्सून माघार घेणार; पुणे, कोकण आणि विदर्भासह अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट
Maharashtra Monsoon Retreat Date संदर्भात भारतीय हवामान विभागाने (IMD) महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. महाराष्ट्रातून नैर्ऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास साधारणपणे ५ ऑक्टोबरच्या सुमारास सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातील बहुतांश भागांतून पूर्णपणे माघार घेईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात सध्या १७ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे, तर संपूर्ण देशाचा विचार केल्यास सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. पुण्यात १० ते १६ सप्टेंबर दरम्यान साप्ताहिक पावसाची तूट तब्बल ८२ टक्के होती, मात्र जिल्ह्याचा एकूण मोसमी पाऊस सरासरीपेक्षा २० टक्के अधिक आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. या हवामान बदलांमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने गुरुवारी नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तर शुक्रवारी गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान अचानक वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुणे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, मराठवाडा आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

पावसाच्या या अंदाजादरम्यान पुणे शहरात एक वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे. पुणे शहराचे मुख्य हवामान केंद्र असलेल्या शिवाजीनगर भागात तब्बल ५२ दिवसांपासून दोन अंकी (१० मिमी किंवा त्याहून अधिक) पाऊस झालेला नाही. मंगळवारी शहरात काही ठिकाणी पावसाने रस्ते जलमय केले असले तरी, शिवाजीनगर येथे २४ तासांत अवघा ०.५ मिमी पाऊस नोंदवला गेला. ‘वेगरीज ऑफ द वेदर’ या संस्थेनुसार, २०१४ नंतरच्या आकडेवारीचा विचार करता २०१८ मधील ६४ दिवसांच्या कोरड्या काळानंतर यंदाचा ५२ दिवसांचा काळ हा पुणेकरांसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोरडा काळ ठरला आहे.













