‘महानिर्मितीचा महाराजा’ गणेशोत्सवात बंदोबस्तादरम्यान सापडले सव्वा दोन तोळ्यांचे ब्रेसलेट; गणेशोत्सव समितीकडून शाल आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार
Ratnagiri Home Guard Honesty चे एक उत्तम उदाहरण समोर आले असून, प्रामाणिकपणा आणि कर्तव्याची उत्कृष्ट सांगड घालत रत्नागिरी होमगार्डच्या महिला कर्मचारी अश्विनी अक्षय निकम यांनी खाकी वर्दीची मान अधिक उंचावणारी कामगिरी केली आहे. चिपळूणजवळील पोफळी येथील महानिर्मितीच्या ‘महाराजा गणेशोत्सवा’दरम्यान हरवलेले सव्वा दोन तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला प्रामाणिकपणे परत करत त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण जवळील पोफळी येथे ‘महानिर्मितीचा महाराजा’ गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. या उत्सवाचे सचिव संजय घोलपकर यांचे सुमारे सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट गर्दीत अथवा कार्यक्रमादरम्यान कुठेतरी गहाळ झाले होते. याच गणेशोत्सवाच्या कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी रत्नागिरी होमगार्ड पथकाच्या महिला कर्मचारी अश्विनी निकम या तेथे कर्तव्यावर तैनात होत्या.
पोफळी येथील सांस्कृतिक भवन परिसरात गस्त घालत असताना अश्विनी निकम यांना हे मौल्यवान सोन्याचे ब्रेसलेट सापडले. कोणताही लोभ न धरता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ या दागिन्याबाबत आपल्या वरिष्ठांना तसेच गणेशोत्सव समितीला कल्पना दिली. त्यानंतर खात्री करून ते ब्रेसलेट सुरक्षितपणे त्याचे मूळ मालक आणि समितीचे सचिव संजय घोलपकर यांच्या स्वाधीन केले.

महिला होमगार्ड अश्विनी निकम यांच्या या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. त्यांच्या या सत्कृत्याची दखल घेऊन ‘श्री गणेशोत्सव महानिर्मितीचा महाराजा पोफळी’ या संपूर्ण समितीच्या वतीने सांस्कृतिक भवन येथे त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.













