Rohit Pawar MPSC Movement: पुणे पोलिसांचा नकार; तरीही २७ तारखेला एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रोहित पवार ठाम

Rohit Pawar MPSC Movement: पुणे पोलिसांचा नकार; तरीही २७ तारखेला एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रोहित पवार ठाम

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह ऑनलाईन परीक्षेला तीव्र विरोध; गरवारे रोडवर ठिय्या आंदोलन करण्याचा रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawar MPSC Movement संदर्भात महाराष्ट्रातील राजकीय आणि शैक्षणिक वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी पुण्यात तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे.

पहिले हे आंदोलन २६ तारखेला शास्त्री रोडवर होणार होते. मात्र, गणेशोत्सवाचे कारण, गर्दीचे ठिकाण आणि शास्त्री रोड परिसरात कलम १६३ लागू असल्याचे सांगत पुणे पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या भूमिकेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील रणनीती स्पष्ट केली. पोलिसांच्या नकारानंतरही २७ तारखेला सकाळी १० वाजता पुण्यातील गरवारे रोडवर हे आंदोलन होणारच, असा ठाम पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्यांविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेऊन तुकाराम मुंढे किंवा सुनील गेडाम यांच्यासारख्या सनदी अधिकाऱ्यांकडे एमपीएससी आयोगाचे अध्यक्षपद सोपवण्यात यावे. परीक्षा पूर्णपणे ऑफलाईनच घेण्यात याव्यात आणि ७० हजार पदांसाठीची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी." तसेच, भीमनवार यांच्या विरोधातील महत्त्वाचे पुरावे लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Radhakrushna patapedhi

रोहित पवार यांनी सरकारवर आंदोलन दडपण्याचा गंभीर आरोप केला आहे. ७० ते ८० विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्याचे त्यांनी सांगितले. हे ठिय्या आंदोलन असणार असून काही विद्यार्थी उपोषणाच्या तयारीत आहेत. सरकारने आंदोलनापूर्वी १५ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून मार्ग काढावा, अन्यथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विनंती करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.