गणेशोत्सवाच्या काळात टपाल सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम; लांजा, राजापूर आणि देवरूख उपविभागात विशेष शिबिरांचे आयोजन
Postal Department Ganpati Night Camp च्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या काळात टपाल विभागाच्या विविध सेवा सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी आणि सुरक्षित बचत, विमा, पार्सल तसेच आधुनिक टपाल सेवांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे रत्नागिरी विभागात विशेष ‘गणपती नाईट कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाच्या डाकघर अधीक्षकांनी केले आहे.
हे नाईट कॅम्प कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, नोकरदार, लहान व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना थेट टपाल अधिकाऱ्यांशी संवाद साधून वैयक्तिक मार्गदर्शन मिळवता येणार आहे. या शिबिरांमध्ये स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, बिझनेस मेल सोल्यूशन्स, ई-कॉमर्स पार्सल, आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट आणि हवाई पार्सल यांसारख्या मेल व पार्सल सेवा उपलब्ध असणार आहेत. याशिवाय पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक अंतर्गत सुरक्षित बचतीसह घरपोच बँकिंग सुविधा आणि सहभागी केंद्रांवर नागरिक केंद्रित सेवा उपलब्ध राहतील.
उपविभागनिहाय शिबिरांचे वेळापत्रक सायंकाळी ७.३० ते रात्री ११.३० या वेळेत पुढीलप्रमाणे असणार आहे:

लांजा उपविभाग (२२ सप्टेंबर): गोंधळी समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पाली, रत्नागिरी (संपर्क: डाकघर निरीक्षक एस. एस. बेलहेकर – ८२७५९२९९३४).
राजापूर उपविभाग (२३ सप्टेंबर): जैतापूरचा राजा सार्वजनिक मंडळ, जैतापूर (संपर्क: डाकघर निरीक्षक योगेश जाधव – ७८८७५६५८५८).
देवरूख उपविभाग (२४ सप्टेंबर): देवरूख पोलिस स्टेशन गणपती मंडळ, देवरूख (संपर्क: डाकघर निरीक्षक शरद खंडारे – ९६७३५९८७६१).
स्थानिक नागरिकांनी या नाईट कॅम्पना भेट देऊन टपाल विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.













