बहुरूपी कलाकाराचा वेश परिधान केलेल्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Ratnagiri Thibaw Palace Child Abduction Attempt संदर्भात रत्नागिरी शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील ऐतिहासिक थिबापॅलेस परिसरात मंगळवारी सकाळी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. मात्र, परिसरातील स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे आणि सतर्कतेमुळे आरोपीला रंगेहात पकडण्यात यश आले असून एक मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी थिबापॅलेस परिसरात बहुरूपी कलाकाराचा वेश परिधान केलेला एक मुलगा वावरत होता. यादरम्यान एका अनोळखी तरुणाने त्या मुलाला फुस लावून जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अचानक होत असलेल्या अपहाराचा प्रकार लक्षात येताच संबंधित मुलाने प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरड केली. मुलाचा टाहो ऐकून परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले.
नागरिकांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित तरुणाला चारी बाजूंनी वेढून जागीच पकडले. संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि घटनेची माहिती तातडीने रत्नागिरी शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीला आपल्या ताब्यात घेतले.

पोलीस प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत हा तरुण मूळचा मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो रत्नागिरीत नेमक्या कोणत्या उद्देशाने आला होता, त्याच्यासोबत इतर कोणी साथीदार आहेत का आणि त्याने मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न का केला, या दिशेने शहर पोलीस अत्यंत सखोल तपास करत आहेत. उशिरापर्यंत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दिवसाढवळ्या ऐतिहासिक थिबापॅलेससारख्या गजबजलेल्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे रत्नागिरीकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी सतर्क राहून परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













