रत्नागिरी : खल्वायन रत्नागिरी या संस्थेची ३०७ वी मासिक संगीत सभा शनिवारी (ता. ९) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत गोदूताई जांभेकर विद्यालयामध्ये आयोजित केली आहे.
(कै.) संजय मुळ्ये स्मृती मासिक संगीतसभा म्हणून साजऱ्या होणाऱ्या या मैफलीत मूळच्या आसामच्या व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या गायिका श्रुती बुजरबरूवा यांच्या शास्त्रीय ख्याल गायनाबरोबरच ठुमरी, दादरा, गझल, अभंग व नाट्यसंगीत गायनाने सदरहू मैफल रंगणार आहे. श्रुती यांना वयाच्या ४ थ्या वर्षापासून आई-वडील संगीता व मुनींद्र बुजरबरूवा यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन मिळाले आहे. पुढे त्यांनी लखनौ येथील भातखंडे संगीत विद्यापीठातून संगीत विशारद आणि संगीत अलंकार या पदव्या प्राप्त केल्या. २०१४ मध्ये त्या पुणे येथे राहायला आल्यानंतर त्यांनी गुरू पंडित विजय कोपरकर यांच्याकडून काही वर्षे शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन घेतले.
दरम्यान, त्यांनी एसएनडीटी विद्यापीठातून मास्टर इन म्युझिक ही पदवी प्राप्त केली तसेच एसएनडीटी विद्यापीठ येथूनच २०१९ ला बीए (म्युझिक) ही पदवीसुद्धा सर्वोत्तम गुण आणि गोल्ड मेडलसहित प्राप्त केली आहे. कलकत्ता, मिरज, दिल्ली, अहमदाबाद, ओरिसा, वाराणसी, पुणे, मुंबई इ. ठिकाणच्या नामवंत संगीत महोत्सवात त्यांचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत. इंटरनॅशनल फाउंडेशन, एनसीपीए आणि भारत सरकारची शास्त्रीय संगीतासाठी शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त आहे. विजया घाटे स्मृती आणि पंडिता रोहिणी भाटे स्मृती पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. या कार्यक्रमाला तबलासाथ हेरंब जोगळेकर व हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन हे रत्नागिरीचे नामवंत वादक करणार आहेत. तरी सर्व संगीत रसिकांनी मैफलीला उपस्थित राहून मैफल श्रवणाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष मनोहर जोशी आणि सहकारी वर्ग यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 09-11-2024














