MPSC Exam Schedule: ‘MPSC’चे मोठे निर्णय; राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलली, २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होणार

MPSC Exam Schedule: 'MPSC'चे मोठे निर्णय; राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलली, २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होणार

उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी आणि विद्यार्थ्यांच्या निवेदनानंतर आयोगाचा निर्णय; स्थापत्य अभियांत्रिकी व गट-ब परीक्षाही लांबणीवर

MPSC Exam Schedule संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) प्रसिद्धीपत्रक जारी करत अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, येत्या ३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ तसेच इतर काही प्रमुख परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत माहिती आयोगाने दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ चे पुनर्मूल्यांकन

प्राप्त माहितीनुसार, अनेक विद्यार्थी संघटना आणि परीक्षार्थींनी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील मूल्यांकनाबाबत आयोगाकडे आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांची गंभीर दखल घेत आयोगाने २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या परीक्षेची पुढील प्रक्रिया काहीशी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Arihant 3

उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी अन् ३ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली

राज्यातील प्रचलित सर्व परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीकडून आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी लवकरच प्राप्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर २०२६ पासून प्रस्तावित असलेली राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलण्याबाबत विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी आयोगाकडे निवेदने दिली होती. सर्व बाबींचा साकल्याने विचार करून आयोगाने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.

स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब मुख्य परीक्षाही लांबणीवर

आयोगाने केवळ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ नव्हे, तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-२०२६ या स्पर्धा परीक्षा देखील पुढे ढकलल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.