Dhamma Lipi Course: रत्नागिरीत सम्राट अशोककालीन व सातवाहन धम्म लिपी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम; १ ऑक्टोबरपासून वर्ग

Dhamma Lipi Course: रत्नागिरीत सम्राट अशोककालीन व सातवाहन धम्म लिपी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम; १ ऑक्टोबरपासून वर्ग

प्राचीन इतिहास आणि शिलालेखांच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम; भारतीय बौद्ध महासभेचे आवाहन

रत्नागिरीत प्राचीन इतिहास अभ्यासक आणि उत्सुक नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. सम्राट अशोककालीन धम्म लिपी आणि सातवाहन धम्म लिपीचा ऑनलाइन अभ्यासक्रम १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. भारतातील बौद्ध संस्कृती, लेणी, स्तूप आणि शिलालेखांचा मूळ इतिहास समजून घेण्यासाठी ही धम्म लिपी शिकणे अत्यंत गरजेचे असल्याने या विशेष अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राचीन भारताचा खरा इतिहास समजण्यासाठी उपक्रम

सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात व्यापारी मार्गांवर लेणी कोरून धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी धम्म लिपीचा वापर केला होता. वेरूळ, अजिंठा यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणी अनेकदा पर्यटकांना चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली जाते. प्राचीन भारताचा खरा आणि अचूक इतिहास जाणून घेण्यासाठी शिलालेखांचे वाचन करता येणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात धम्म लिपीचे प्राचीनत्व आणि त्यापासून इतर भारतीय लिप्यांची झालेली निर्मिती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

Arihant 4

१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान मोफत प्रशिक्षण; वयाचे बंधन नाही

हा ऑनलाइन अभ्यासक्रम १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रोज संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत घेतला जाईल. यामध्ये पहिले १५ दिवस सम्राट अशोककालीन धम्म लिपी आणि पुढील १५ दिवस सातवाहन धम्म लिपी शिकवली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत असून शिकण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही; फक्त २०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

प्रवेशासाठी येथे संपर्क साधा

या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी पाली भाषा व धम्म लिपी अभ्यासक प्रा. डॉ. दिलीप वामनराव वासनिक (९४२२४६९४७७) किंवा भारतीय बौद्ध महासभेचे रत्नागिरी जिल्हा केंद्रीय शिक्षक विजय यशवंत जाधव (९४२२६२९६२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.