Legal Aid Scheme Bamnoli: बामणोलीत घरोघरी पोहोचणार कायदेशीर मदत! दुर्गम गावात विधी साहायता कक्ष सुरू

Legal Aid Scheme Bamnoli: बामणोलीत घरोघरी पोहोचणार कायदेशीर मदत! दुर्गम गावात विधी साहायता कक्ष सुरू

दुर्गम भागातील नागरिकांची शासकीय उंबरे झिजवण्याची गरज आता संपणार

रत्नागिरी : दुर्गम भागातील दुर्बल, उपेक्षित आणि वंचित घटकांना थेट घरापर्यंत कायदेशीर मदत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे (NALSA) देशव्यापी विधी सेवा महामोहीम राबवली जात आहे. या मोहिमेसाठी महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याची निवड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व डोंगरदऱ्यांत वसलेल्या बामणोली गावाची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली असून २५ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात येत आहे.

विधी स्वयंसेवकांकडून घरोघरी जाऊन सविस्तर सर्वेक्षण
या मोहिमेअंतर्गत बामणोली येथे ‘विधी साहायता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. विधी स्वयंसेवक, विधी शाखेचे विद्यार्थी आणि पॅनेल ॲडव्होकेट गावातील प्रत्येक कुटुंबाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या कायदेशीर व शासकीय योजनांशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. या सर्वेक्षणात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, मानवी-वन्यजीव संघर्षामुळे किंवा हल्ल्यात शेतीचे नुकसान झालेले शेतकरी, दुखापतग्रस्त व्यक्ती, शाळाबाह्य मुले, ओळखपत्रांपासून वंचित मुले, आजी-माजी सैनिकांचे कुटुंबीय, आदिवासी बांधव आणि व्यसनाधीन व्यक्तींची माहिती संकलित केली जात आहे.

१३ कल्याणकारी योजनांची जनजागृती आणि प्रत्यक्ष लाभ
ही मोहीम केवळ माहिती संकलनापुरती मर्यादित न राहता गरजू नागरिकांना आवश्यक शासकीय दाखले मिळवून देणे, १३ विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे आणि संबंधित शासकीय कार्यालयांशी समन्वय साधून प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना कोर्ट आणि सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

Tata tiago

या मोहिमेत खालील १३ प्रमुख योजनांबद्दल जनजागृती व मदत केली जात आहे:

संवाद योजना २०२५: आदिवासी समाजासाठी कायदेशीर व कल्याणकारी माहिती

वीर सहायता योजना २०२५: सैनिकांच्या कुटुंबांसाठी साहाय्य

कायदेशीर सेवा योजना २०१६: ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण

मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणविरोधी योजना २०१५ ॲसिड हल्ला पीडितांसाठी योजना २०१६

असंघटित कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना २०१५

दारिद्र्य निर्मूलन योजना २०१५

‘DAWN’ योजना २०२५: अमली पदार्थमुक्तीसाठी विशेष मोहीम

मानव-वन्यजीव संघर्ष पीडित योजना २०२५

बालस्नेही कायदेशीर सेवा योजना २०२४

शिक्षा योजना २०२६: शिक्षणाचा हक्क व साहाय्य

मानसिक व बौद्धिक दिव्यांग व्यक्तींसाठी कायदेशीर योजना २०२४

स्पृहा योजना २०२५

पात्र लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजनांचा थेट लाभ पोहोचवण्याच्या दृष्टीने बामणोली गावातील ही विशेष मोहीम अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे.