Ratnagiri Connectivity and Reservation Demand: रत्नागिरीत प्रत्येक गावात २०२९ पर्यंत मोबाईल रेंज द्या – आमदार प्रमोद जठार

Ratnagiri Connectivity and Reservation Demand: रत्नागिरीत प्रत्येक गावात २०२९ पर्यंत मोबाईल रेंज द्या - आमदार प्रमोद जठार

स्थानिक भरतीत ७०% आरक्षणाची आमदार जठारांची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात २०२९ पर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी भाजप विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. जिल्हा नियोजनाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मोबाईल कनेक्टिव्हिटीचा थेट संबंध शेतकऱ्यांशी आहे; कारण ई-पीक पाहणी किंवा शासकीय धान्य खरेदीच्या वेळी रेंज नसेल, तर शेतकऱ्यांना ऑफलाईन काम करावे लागते आणि त्यांचे नुकसान होते. त्यामुळे २०२९ चे टार्गेट ठेवून बीएनएल, जिओ किंवा एअरटेलच्या माध्यमातून एकाच इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून प्रत्येक गावात नेटवर्क पोहोचवले पाहिजे, असा मुद्दा त्यांनी मांडला असून त्याला सर्व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवला आहे.

स्थानिक भूमिपुत्रांसाठी ७० टक्के आरक्षणाची मागणी
मोबाईल रेंजबरोबरच आमदार जठार यांनी शिक्षक, महसूल आणि आरोग्य भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ७० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात झालेल्या ६५० शिक्षकांच्या भरतीमध्ये तसेच शेजारच्या सिंधुदुर्गात १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षक हे परजिल्ह्यातील आहेत. कोकणात निर्माण होणाऱ्या १ लाख रोजगारांपैकी ६० ते ८० हजार रोजगार बाहेर जातो. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आरोग्य, महसूल व शिक्षण विभागाच्या भरतीमध्ये ७० टक्के जागा स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांसह दोन्ही खासदार, मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन घटनात्मक तोडगा काढावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटन विकास आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तातडीने नियोजन करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. पाटणे, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ronic