जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात पार पडली स्पर्धा; पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेल्या कुस्ती मॅटमुळे खेळाडूंना प्रोत्साहन
Ratnagiri School Wrestling Competition चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. २७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून सुमारे २२५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
१४, १७ आणि १९ वर्षांखालील गटात रंगले सामने
या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांमध्ये फ्रीस्टाईल व ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारातील सामने पार पडले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे सचिव सदानंद जोशी यांच्यासह विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय स्पर्धेसाठी ७८ मल्लांची जम्बो टीम जाहीर
जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेल्या कौशल्याच्या जोरावर फ्रीस्टाईल आणि ग्रिकोरोमन प्रकारातून विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याची ७८ विद्यार्थ्यांची जम्बो टीम निवडण्यात आली आहे. हे निवडलेले खेळाडू आता विभागीय पातळीवर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
आधुनिक कुस्ती मॅटमुळे सरावाला गती
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी आधुनिक कुस्ती मॅट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुका पातळीवर सुरू असलेल्या नियमित सरावामुळे यंदाच्या जिल्हा स्पर्धेत खेळाडूंची उपस्थिती २२५ पर्यंत पोहोचल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले. तालुकास्तरीय स्पर्धेनंतर जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद कुस्ती क्षेत्रासाठी आशादायक ठरत आहे.













