“तरुण अभ्यास करून बोलतायत, मोठे लोक खोटेपणा लपवतायत”; अभिनेते सयाजी शिंदेंचे वक्तव्य चर्चेत
Sayaji Shinde on Gen-Z Movement संदर्भात ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी अत्यंत परखड आणि स्पष्ट मत मांडले आहे. देशभरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक मुद्द्यांवर तरुण पिढी म्हणजेच ‘जेन-झी’ (Gen-Z) कडून आवाज उठवला जात असताना, सयाजी शिंदे यांनी या आंदोलनाचे पूर्ण समर्थन केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी तरुणांच्या प्रश्नांकडे समाजाने व प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली असून त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
"लायकी नसेल तर कानाखाली मारायची वेळ आलीये"
ज्येष्ठांचा आदर राखण्याच्या परंपरेवर बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, मोठ्या माणसांना इज्जत देणे आणि त्यांचा आदर करणे योग्य आहे, मात्र केवळ वय मोठे आहे म्हणून त्यांच्या प्रत्येक चुकीच्या कृतीचे समर्थन केले जाऊ शकत नाही. "आता मोठ्या माणसांना इज्जत द्या, आदर द्या, त्यांचे अनुकरण करा… पण ते जर त्या लायकीचे नसतील तर त्यांच्या कानाखाली मारायची वेळ आता आली आहे किंवा त्यांनी तशी वेळ आणली आहे," असे खळबळजनक विधान त्यांनी केले.

"आम्ही सर्व जेन-झींच्या बाजूने"
taruṇ पिढीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करत सयाजी शिंदे म्हणाले, "या मुलांच्या बाजूने आपण उभे राहू. आम्ही सर्व जेन-झींच्या बाजूने आहोत." तरुण पिढी हवेत बोलत नसून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल अभ्यास करून अभ्यासपूर्ण पद्धतीने आपले प्रश्न मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ पिढीला आत्मपरीक्षणाचा सल्ला
गेल्या काही महिन्यांत जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून ते महाराष्ट्रातील विविध आंदोलनांपर्यंत तरुणांचा सामाजिक सहभाग वाढला आहे. जुन्या आणि नव्या पिढीतील विचारांमधील फरकावर बोट ठेवताना ते म्हणाले, "तरुण अभ्यासपूर्ण बोलत आहेत आणि मोठी मंडळी आपला खोटेपणा लपवण्यासाठी धडपडत आहेत, हे आजचे दुर्दैव आहे." पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे ज्येष्ठ पिढीनेही आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.













