५८ लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचा प्रश्न १७ डिसेंबरपूर्वी सोडवण्याची मागणी; १५ दिवसांत सर्व षड्यंत्रांचा खुलासा करण्याचा दावा
मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा पुन्हा एकदा अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे प्रलंबित मागण्यांचा पुनरुच्चार करत थेट इशारा दिला आहे. मोडी लिपी वाचकांना तातडीने अधिकार देऊन कुणबी नोंदी शोधण्याचे काम गतीने करावे, हैदराबाद गॅझेटियरमध्ये सुधारणा करावी आणि ५८ लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचा प्रश्न १७ डिसेंबरपूर्वी मार्गी लावावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
"सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा बांध फुटू देऊ नये"
मोडी लिपी वाचकांबाबत आणि गॅझेटिअरबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “आम्ही सरकारला मोडी भाषा वाचक पुरवले आहेत. त्यांना तातडीने अधिकार देऊन नोंदी शोधून समाजाचे भले करावे. ज्यांना भाषा येत नसेल त्यांना हाकलून द्या, मात्र ज्यांना येते त्यांच्याकडून काम करून घ्या. हैदराबाद गॅझेटिअर सुधारित काढून मराठा समाज कुणबी असल्याचे त्यात नमूद करावे. सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे १७ डिसेंबरच्या आत वितरीत करावीत, अन्यथा समाजाच्या संयमाचा बांध फुटू शकतो.”

"१५ दिवसांत सर्व प्रकरणाचा खुलासा करेन"
आपल्याविरोधात होत असलेल्या आरोपांवर आणि सहकाऱ्यांवर सुरू असलेल्या कारवाईवर भाष्य करताना जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले. ते म्हणाले, “माझ्याविरोधात तक्रारी करून मला एकटे पाडण्याचा आणि जेरीस आणण्याचा विडा काहींनी उचलला आहे. मी मॅनेज होत नाही म्हणूनच माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. मात्र मी मरेल पण शरण जाणार नाही. गुलाम व्हायचं नाही, प्रसंगी मरू पण सोडणार नाही. आगामी १५ दिवसांत या संपूर्ण षड्यंत्राबाबत आणि यात कोण कोण सामील आहे, याचा पोलखोल खुलासा समाजासमोर करणार आहे.”
आंदोलकांना संयम राखण्याचे आणि शत्रूची खेळी ओळखण्याचे आवाहन
माजी सहकारी ललिता तारख यांच्या तक्रारीबाबत आणि इतर सहकाऱ्यांच्या कारवायांवर बोलताना त्यांनी मराठा समाजाला शांततेचा आणि संयमाचा सल्ला दिला. “आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि आपण विजयाजवळ आहोत. त्यामुळे शांत राहून काम करणे मराठ्यांनी शिकले पाहिजे. आपण क्षत्रिय धर्म सोडणार नाही, मात्र योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.













