Raj Thackeray Uddhav Thackeray PC: भायखळा ते सीएसएमटी निघणार महामोर्चा; राज ठाकरेंचे “हमका हिंदी आता नहीं…” म्हणत मिश्कील उत्तर

Raj Thackeray Uddhav Thackeray PC: भायखळा ते सीएसएमटी निघणार महामोर्चा; राज ठाकरेंचे "हमका हिंदी आता नहीं..." म्हणत मिश्कील उत्तर

कोणत्याही पक्षाचे झेंडे नसणार; निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनासाठी सर्वपक्षीयांना फोनवरून आमंत्रण

मुंबई मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील ‘शिवतीर्थ’वर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची सविस्तर रूपरेषा जाहीर केली. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभाराविरोधात निघणारा हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून थेट निवडणूक आयोगाच्या बेबंदशाहीविरोधात असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

सकाळी साडेअकरा वाजता भायखळ्यावरून निघणार मोर्चा

४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता भायखळा येथील ‘रिचर्डसन अँड क्रूडास’ कंपनीजवळून या मोर्चाला सुरुवात होईल. जे. जे. उड्डाणपुलावरून मार्गस्थ होत मुंबई महानगरपालिकेजवळ (सीएसएमटी) या महामोर्चाची सांगता होईल. या मोर्चानंतर आंदोलनाची पुढील रूपरेषा निश्चित केली जाईल, असे राज ठाकरेंनी सांगितले.

Tata motars punch

सर्वपक्षीयांना निमंत्रण; पक्षाचे झेंडे वापरण्यास बंदी

या मोर्चात कोणत्याही पक्षाचे झेंडे असणार नाहीत, तर केवळ निवडणूक आयोगाविरोधातील अजेंडा घेऊनच नागरिक व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. या आंदोलनासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना स्वतः फोन करून आमंत्रित केले जाणार असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. याच वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावरही आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली.

"हमका हिंदी आता नहीं…"; शिवतीर्थावर पिकला एकच हशा

पत्रकार परिषद संपल्यानंतर शिवतीर्थावर काहीसे हलके-फुलके वातावरण पाहायला मिळाले. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने राज ठाकरेंकडे हिंदीत प्रतिक्रिया देण्याची विनंती केली. त्यावर राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत मिश्कीलपणे "हमका हिंदी आता नहीं…" असे उत्तर देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांकडे बोट दाखवत "हिंदी प्रतिक्रियेसाठी आमचे खासदार आहेत" असे म्हटले, तर आदित्य ठाकरेंनीही "कोणाचा कुणाशी संपर्क आहे हे तुम्हीच सांगा" असा टोला लगावत वातावरणातील रंगत आणखी वाढवली.