साडवली : संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी-किरदाडी येथील लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि संस्थाध्यक्ष सुरेश कदम यांच्या सौजन्याने कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी भक्त सेवार्थ पंढरपूर यात्रेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचा शुभारंभ मराठा भवन, देवरुख येथे माजी आमदार सुभाष बने व निखिल सुरेश कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पार पडला. यंदाचे हे सहावे वर्ष असून या वर्षी तालुक्यातील वारकरी मंडळींसाठी देवरुख ते पंढरपूर अशा ११ बसेस सोडण्यात आल्या आहेत.
सकाळी मराठा भवन येथे मुंबई येथील विश्वास चव्हाण प्रस्तुत सुरेल सुस्वर अभंगनाद हा कार्यक्रम पार पडला. सूर निरागस हो, सुंदर ते ध्यान, अबीर गुलाल, विठू माऊली तू अशा सुमधुर गीतांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आमदार राजन साळवी, माजी आमदार डॉ. सुभाष बने यांसह शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दत्ताराम लिंगायत, राजेंद्र जाधव, सुबोध पेडणेकर व वारकरी मंडळी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सुभाष बने म्हणाले, सुरेश कदम यांचे कार्य हे निःस्वार्थी व अभ्यासपूर्ण असते. कार्यकर्तेदेखील त्यांना या कामात सहकार्य करतात. आज वारकऱ्यांना विठ्ठलाच्या चरणी नेण्याचे पुण्यकर्म सुरेश कदम यांचे हातून होत आहे, ही कौतुकाची बाब आहे. संविधा करंडे म्हणाल्या, सामाजिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रात कदम यांचे काम मोठे आहे. नेहा साळवी यांनी अभंगातील दोन ओळी सांगितल्या. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला, तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला… ते… भेटला विठ्ठल माझा या ओळीपर्यंतचा प्रवास प्रत्यक्षात कदम यांनी आम्हा पांडुरंगाच्या भेटीसाठी व्याकुळ असलेल्या वारकऱ्यांना पंढरीची वारीच्या रूपाने आज घडून आणला आहे. यंदाचे हे सहावे वर्ष आहे.
लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचे सहसचिव संतोष जाधव यांनी कदम यांच्या कार्याविषयी सांगितले की, मी गेली वर्षभर एका गंभीर आजाराने त्रस्त होतो. आज मी इथे उभा आहे तो केवळ कदम साहेबांमुळेच. कारण त्यांनी मुंबई येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये मला दाखल केले व उपचार केले. त्यामुळे मी त्यांचा सदैव ऋणी आहे.
यावेळी कदम यांच्या आत्या कै. इंदुमती सुर्वे व चालक सईद बोदले यांचे दिवंगत वडील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश कदम, संतोष चाळके यांसह अनेकजणांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेंद्र नांदळजकर व सुनील करंडे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 09/Nov/2024













