आमदार शेखर निकम यांच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल आक्रमक; खा. तटकरे यांना दिले निवेदन
चिपळूण (रत्नागिरी): चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केली आहे. यासंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदनाद्वारे ही मागणी सादर करण्यात आली.
कोकणात संघटनात्मक मजबुतीसाठी मंत्रिपदाची गरज
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाल्यास कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत होण्यास मोठी मदत होईल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नव्या ऊर्जेची आणि सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी निवेदनावारे निदर्शनास आणून दिले आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व खा. तटकरेंचे आश्वासन
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, चिपळूण तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष इमाम शहा, चिपळूण शहर उपाध्यक्ष सलीम पालोजी, सोहेल परकार, नगरसेविका शहानाजा वांगडे, लतीफ परकार, शकील सुर्वे, खालिद पटाईत आणि अमजद काझी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांनी हे निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक विचार करण्याचे ठोस आश्वासन दिल्याची माहिती अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.













