Lanja Land Dispute Assault News: लांजातील पालू कुंभारवाडीत जमिनीच्या मोजणीवरून वाद उफाळला; एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण

Lanja Land Dispute Assault News: लांजातील पालू कुंभारवाडीत जमिनीच्या मोजणीवरून वाद उफाळला; एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण

लांजा पोलिसांत ५ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल

लांजा (रत्नागिरी): लांजा तालुक्यातील पालू कुंभारवाडी येथे घर परसवातील जमिनीच्या हद्दीवरून दोन शेजाऱ्यांमध्ये असलेला जुना वाद अचानक उफाळून आला आहे. शासकीय मोजणीनंतर आलेल्या निकालाचा राग मनात धरून चिव्याच्या काठ्या, प्लॅस्टिकची खुर्ची आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय मोजणीनंतर राग अनावर; खुर्ची आणि काठ्यांनी हल्ला

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पालू कुंभारवाडी येथील रहिवासी साळवी आणि देवळेकर कुटुंबीय शेजारी-शेजारी राहतात. त्यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून घरासमोरील परसवाच्या जागेवरून सीमावाद सुरू होता. या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी साळवी कुटुंबाने मंगळवारी जमिनीची अधिकृत शासकीय मोजणी करून घेतली. या मोजणीदरम्यान साळवी यांची काही जागा संशयित देवळेकर यांच्या हद्दीत, तर देवळेकर यांचे सुमारे अर्धे घर साळवींच्या जागेत येत असल्याचे निष्पन्न झाले.

Mahrashi karve ANM

याच कारणाचा राग मनात धरून संशयितांनी साळवी यांच्या घराजवळ जाऊन शिवीगाळ व दमदाटी केली. वाद मिटवण्यासाठी आणि सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेले साक्षीदार नामदेव साळवी यांना संशयितांनी प्लॅस्टिकच्या खुर्चीने डोक्यात मारहाण करून दुखापत केली. त्यांना वाचवण्यासाठी फिर्यादी स्नेहल साळवी, त्यांचे वडील मनोहर साळवी आणि आई मधुरा साळवी धावून गेले असता, संशयितांनी चिव्याच्या काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी चौघांनाही बेदम मारहाण केली.

देवळेकर कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा नोंद

या घटनेनंतर स्नेहल मनोहर साळवी यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चंद्रकांत धोंडू देवळेकर, दिनेश धोंडू देवळेकर, सत्यवान धोंडू देवळेकर, प्रभात दिनेश देवळेकर आणि सचिन सत्यवान देवळेकर (सर्व रा. पालू कुंभारवाडी, ता. लांजा) या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पोलीस अंमलदार शेडे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.