Chiplun Bus Stand Construction: चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाचा ‘सांगाडा’च तयार! काम पूर्ण कधी होणार? प्रवाशांचा सवाल

Chiplun Bus Stand Construction: चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाचा 'सांगाडा'च तयार! काम पूर्ण कधी होणार? प्रवाशांचा सवाल

काम कासवगतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय; वाढीव निधीची निविदा प्रक्रिया अद्याप सुरूच

चिपळूण (रत्नागिरी):

Chiplun Bus Stand Construction म्हणजेच चिपळूण शहरातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकाची हायटेक इमारत गेल्या अनेक वर्षांपासून केवळ सांगाड्याच्या स्वरूपात पडून आहे. अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेल्या या बांधकामामुळे हे संपूर्ण एसटी बसस्थानक कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. चिपळूण मध्यवर्ती एसटी स्थानकाला जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवले जात आहे का, अशी शंकाही आता एसटी प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

भूमिपूजनानंतरही काम रखडले; पावसात हाल

Tata tiago

२०२० मध्ये तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. मात्र, भूमिपूजनानंतरही हे काम अंधारातच राहिले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात एसटी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यापूर्वी २०२१ मधील महापुरात या निर्माणाधीन बसस्थानकाचे मोठे नुकसान झाले होते. सुरुवातीची तब्बल ४ वर्षे केवळ पाया रचण्यातच गेली, तर मागील दोन वर्षांत केवळ छताचा सांगाडा तयार झाला आहे. ६ वर्षे उलटूनही इमारत अपूर्णच असल्याने याच्या जबाबदारीवर सवाल उपस्थित केले जात आहेत.

राजकीय पाठपुरावा आणि प्रवाशांचा संताप

गणेशोत्सव किंवा शिमगोत्सवासाठी कोकणात येणारे चाकरमानी एसटी स्थानकाची दुरवस्था पाहून निराश होत आहेत. आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने उर्वरित कामासाठी अडीच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला होता. तसेच तत्कालीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या अर्धवट कामाची पाहणी करून सूचना दिल्या होत्या, मात्र तरीही निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या सर्व राजकीय पक्षांनी आंदोलने करूनही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. रत्नागिरी, लांजा आणि चिपळूण येथील बसस्थानकांचे काम एकाच वेळी सुरू झाले असताना, रत्नागिरीत एमआयडीसीच्या निधीतून सुंदर बसस्थानक उभे राहिले, मग चिपळूण बसस्थानकावरच अन्याय का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

पुढच्या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची आशा

याबाबत एसटी महामंडळाच्या स्थानिक अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या निधीची कोणतीही अडचण नाही. वाढीव निधीची निविदा प्रक्रिया सुरू असून येत्या महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल. सद्यस्थितीत सुरू असलेली कामे मार्चअखेरपर्यंत, तर नव्या निविदेतील कामे मेअखेरपर्यंत पूर्ण केली जातील. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी चिपळूण मध्यवर्ती एसटी बसस्थानकाची सुसज्ज इमारत उभी राहील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.