मंडणगड ग्रामीण रुग्णालयात विशेष संदर्भ सेवा आरोग्य शिबीर संपन्न; ३९ बालकांना पौष्टिक लाडू आणि ३७ जणांना औषधोपचार
मंडणगड (रत्नागिरी): तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे ‘लडू गोपाल’ योजनेअंतर्गत ‘सॅम’ (तीव्र कुपोषित) व ‘मॅम’ (मध्यम कुपोषित) बालकांसाठी विशेष संदर्भ सेवा आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये तालुक्यातील एकूण ४१ बालकांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय तपासणी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना मंडणगडच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्ञानेश्वरी दातीर यांची प्रमुख उपस्थिती होती. डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रांजल तौर यांनी बालकांची सखोल शारीरिक तपासणी केली. तपासणीदरम्यान बालकांचे वजन, उंची, डोक्याचा घेर आणि दंडघेर मोजून त्यांच्या शारीरिक वाढीचे अचूक मूल्यांकन करण्यात आले.

आरोग्य शिबिरातील बालकांची आकडेवारी व उपचार
शिबिरामध्ये एकूण ४१ बालकांची आरोग्य तपासणी झाली, ज्यामध्ये ७ तीव्र कुपोषित (‘सॅम’), २३ मध्यम कुपोषित (‘मॅम’), तर ११ सर्वसाधारण बालकांचा समावेश होता. गरजेनुसार ३७ बालकांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले, तर ३९ बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात आले.
कुपोषण निर्मूलनासाठी विविध शासकीय योजनांचा समन्वय
कुपोषण निर्मूलनासाठी विविध शासकीय योजनांचा योग्य समन्वय साधून बालकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हे आरोग्य शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले आहे.













