Lanja Illegal Cattle Transportation News: लांजात दोन बैलांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कारवाई; २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Lanja Illegal Cattle Transportation News: लांजात दोन बैलांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कारवाई; २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूरच्या दोन संशयितांवर लांजा पोलिसांत गुन्हा दाखल; २ बैलांची सुटका करत बोलेरो पिकअप जप्त

लांजा (रत्नागिरी): लांजा ते दाभोळे मार्गावरील कुरचुंब फाटा येथे पिकअप टेम्पोतून दोन बैलांची अत्यंत दाटीवाटीने व सर्व नियमांचे उल्लंघन करून केली जाणारी बेकायदेशीर वाहतूक लांजा पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन बैलांची सुटका करून बोलेरो पिकअप वाहनासह एकूण २ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन संशयितांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूरच्या दोघांवर गुन्हा दाखल

सत्यजित गंगाराम कोलापटे (वय २३, रा. आंबा मानोलीजवळ धनगरवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि सुरेश धोंडीबा बरागडे (वय ३३, रा. चांदोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील संशयित सुरेश बरागडे याच्याविरुद्ध यापूर्वीही देवरूख पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ आणि बेकायदेशीर वाहतुकीसंदर्भात गुन्हा दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.

Shree clinic

गस्तीदरम्यान कुरचुंब फाटा येथे उघडकीस आला प्रकार

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कळंत्रे हे पोलीस पथकासह गस्तीवर असताना लांजा-दाभोळे मार्गावरील कुरचुंब फाटा येथे बोलेरो पिकअप (क्रमांक MH 09 GJ 2825) संशयास्पदरीत्या जाताना दिसली. पोलिसांनी तत्परतेने वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनाच्या हौद्यामध्ये दोन बैल अत्यंत दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळून आले. बैलांना हालचाल करता येऊ नये अशा पद्धतीने आखूड दोरीने बांधण्यात आले होते. तसेच वाहनाचा हौदा चारही बाजूंनी ताडपत्रीने बंद केल्याने हवा खेळती राहण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती.

वाहतुकीच्या नियमांचे उघड उल्लंघन

तपासणीदरम्यान वाहनात जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पार्टीशन, चारा-पाणी, प्रथमोपचार किंवा वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र नव्हते. तसेच वाहनावर गुरे वाहतूक करत असल्याचा कोणताही फलक लावण्यात आला नव्हता. या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी १०,५०० रुपये किमतीचे दोन बैल आणि २ लाख ५० हजार रुपयांचा पिकअप टेम्पो जप्त केला.

पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कळंत्रे यांच्या फिर्यादीवरून प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा, प्राण्यांची वाहतूक नियम, मोटार वाहन कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयितांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. घटनास्थळी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी भेट दिली असून, पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल यू. यू. शेडे करत आहेत.