उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे पालकांना आवाहन; नगर परिषद शाळा क्र. २ च्या इमारतीत वर्ग
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात नव्याने सुरू झालेल्या ‘केंद्रीय विद्यालय, रत्नागिरी’ मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी ची अधिकृत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार सीबीएसई (CBSE) शिक्षणाची कवाडे आता रत्नागिरीतील विद्यार्थ्यांसाठी खुली झाली असून, बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत प्रवेश निश्चित करावा, असे जाहीर आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केले आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रवेश प्रक्रिया :
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी प्रवेश दिले जात आहेत. केंद्र सरकारच्या उच्च शैक्षणिक मानकांनुसार चालवल्या जाणाऱ्या या विद्यालयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण शहरातच उपलब्ध होणार आहे. "शिक्षण हाच खरा विकास" हा विचार केंद्रस्थानी ठेवून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे:
१) विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो (१ प्रत)
२) जन्मतारखेचा दाखला व जन्मतारखेचा पुरावा (३१/०३/२०२६ रोजीची वयाची पडताळणी)
३) आधार कार्ड
४) रक्तगटाचे प्रमाणपत्र (Blood Group Certificate)
५) निवासाचा पुरावा (निवासी दाखला)
६) ईडब्ल्यूएस (EWS) प्रमाणपत्र किंवा बीपीएल (BPL) कार्ड (लागू असल्यास)
७) जात प्रमाणपत्र (SC / ST / OBC-NCL – लागू असल्यास)
८) नोकरदार पालकांसाठी सेवा प्रमाणपत्र (Service Certificate) व बदल्यांच्या संख्येबाबतचे प्रमाणपत्र
९) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१०) मागील इयत्तेचा शाळा सोडल्याचा दाखला (TC) व गुणपत्रक/प्रगतीपुस्तक (प्रवेश निश्चित झाल्यानंतर)
११) इतर आवश्यक पूरक कागदपत्रे
शाळेचा पत्ता व संपर्क तपशील :
केंद्रीय विद्यालय, लोकमान्य टिळक नगर परिषद शाळा क्रमांक २, रत्नागिरी – ४१५६३९ येथे ही शाळा सुरू असून प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी ०२३५२-२५३६५४ किंवा ९५७३८०८०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.













