मुंबई-गोवा महामार्गावरील साई मोटार दुकानाचे शटर उचकटून १ लाख ४ हजार रुपयांचे साहित्य चोरीला
चिपळूण (रत्नागिरी): मुंबई-गोवा महामार्गावरील आगवे येथे असणारे ‘साई मोटार अँड स्पेअर पार्ट’ हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून १ लाख ४ हजार रुपयांचे स्पेअर पार्ट आणि इतर साहित्य लांबवल्याची घटना घडली आहे. ही चोरी २८ सप्टेंबरच्या रात्री घडली असून, याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गालगतच्या दुकानात चोरीची घटना
मांडकी कासारवाडी येथील रहिवासी वैभव प्रभाकर डोंगरे यांच्या मालकीचे आगवे येथे महामार्गालगत असलेल्या पॅसिफिक हॉटेलशेजारी स्पेअर पार्टचे दुकान आणि गॅरेज आहे. २८ सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी या दुकानाला लक्ष्य केले. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर डोंगरे यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदवली.

चोरीस गेलेल्या साहित्याचा तपशील व पोलिसांचा तपास
अज्ञाताने हत्याराच्या साह्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील ऑईल पॅकिंग बकेट, ऑईल पॅकिंग कॅन, बोलेरो गाडीचे टायर, रॉड, टेम्पो ट्रॅव्हलरचे क्लच आणि इतर महागडे स्पेअर पार्ट चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून सावर्डे पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.













