Ratnagiri Voter List Update: एसआयआरमुळे मृत, बोगस मतदारांचा तिढा कायमचा सुटण्यास मदत होणार; जिल्ह्यात १ लाख ३१ हजार अर्ज अयोग्य

Ratnagiri Voter List Update: एसआयआरमुळे मृत, बोगस मतदारांचा तिढा कायमचा सुटण्यास मदत होणार; जिल्ह्यात १ लाख ३१ हजार अर्ज अयोग्य

रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत मोठी प्रशासकीय कारवाई; १ लाख ३१ हजार ६१० नावे विविध कारणांमुळे अयोग्य

रत्नागिरी : निवडणुका अधिक पारदर्शक आणि अचूक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. २४ ऑगस्ट रोजी प्राप्त अधिकृत अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतून तब्बल १ लाख ३१ हजार ६१० मतदारांची नावे विविध तांत्रिक कारणांमुळे अयोग्य ठरवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण १३ लाख २९ हजार ४२ नोंदणीकृत मतदारांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात अयोग्य नावे वगळली जाणार असल्याने वर्षानुवर्षे रेंगाळलेला मृत आणि बोगस मतदारांचा तिढा सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

स्थलांतरित नागरिक आणि मृत मतदारांची आकडेवारी

निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, या विशेष मोहिमेत रोजगारासाठी किंवा इतर कारणांमुळे जिल्ह्याबाहेर गेलेले ६२ हजार ९८३ नागरिक कायमचे स्थलांतरित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय ३४ हजार ६२६ मतदारांचे निधन झाले असून, १८ हजार ५० मतदार राहत्या पत्त्यावर अनुपस्थित किंवा शोध न लागलेले आढळले आहेत. विशेष म्हणजे, १५ हजार ६७० मतदारांची नावे आधीच इतर ठिकाणी नोंदवलेली असतानाही येथे दुबार आढळली, तर २८१ अर्ज इतर तांत्रिक कारणांमुळे अयोग्य ठरले आहेत.

Gadre3

हजारो नावे वगळल्याने मतदारांमध्ये नाराजी

लवकर व अचूक मोहीम राबवण्याच्या नादात अनेक वैध मतदारांची नावे कायमस्वरूपी स्थलांतरितांच्या यादीत गेल्याने नाराजीचे वातावरण आहे. राज्यात आपले नाव आणि क्रमांक वरच्या स्थानी झळकावा यासाठी काही अधिकाऱ्यांनी घाईगडबडीने मतदार यादीचा कार्यक्रम राबवून जिल्ह्यात व राज्यात नंबर पटकावला, परंतु या प्रक्रियेत प्रत्यक्ष स्थलांतरित झालेले नसतानाही हजारो मतदारांची नावे स्थलांतरितांच्या यादीत ढकलली गेल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र आक्षेप घेतला जात आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय अयोग्य अर्जांची स्थिती

रत्नागिरी मतदारसंघ: एकूण २ लाख ९१ हजार ५२० मतदारांपैकी सर्वाधिक ४३ हजार ५७१ अर्ज अयोग्य आढळले. यात १२ हजार ३४४ मयत, ११ हजार १२८ अनुपस्थित, १४ हजार ७५८ स्थलांतरित, ५ हजार २५६ दुबार आणि ८५ इतर कारणांचा समावेश आहे.

दापोली मतदारसंघ: २ लाख ९० हजार ४४७ मतदारांपैकी २५ हजार ६४६ अर्ज अयोग्य ठरले. यात ६ हजार ११० मयत, २ हजार ३१५ अनुपस्थित, १३ हजार ८६३ स्थलांतरित, ३ हजार ३११ दुबार व ४७ इतर अर्ज आहेत.

चिपळूण मतदारसंघ: २ लाख ७१ हजार ४३३ मतदारांपैकी २५ हजार ३८६ अर्ज अयोग्य निष्पन्न झाले. यात ५ हजार ४२९ मयत, ३ हजार २८ अनुपस्थित, १४ हजार २३६ स्थलांतरित, २ हजार ६१५ दुबार व ७८ इतर अर्जांचा समावेश आहे.

गुहागर मतदारसंघ: २ लाख ४२ हजार ४६८ मतदारांपैकी १९ हजार ९०३ अर्ज अयोग्य आढळले. यात ५ हजार २१३ मयत, ९३८ अनुपस्थित, १० हजार ६०१ स्थलांतरित, ३ हजार १२१ दुबार व ३० इतर अर्ज आहेत.

राजापूर मतदारसंघ: २ लाख ३३ हजार १७४ मतदारांपैकी १७ हजार १०४ अर्ज बाद झाले. यात ५ हजार ५३० मयत, ६४१ अनुपस्थित, ९ हजार ५२५ स्थलांतरित, १ हजार ३६७ दुबार व ४१ इतर अर्जांचा समावेश आहे.

या व्यापक शुद्धीकरण प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील मतदार याद्या आता अधिक अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होत आहे.