पाणी मशीन दुरुस्ती आणि थकबाकीच्या मुद्द्यावरून ग्रामसभेत ठराव मांडण्याची तयारी
देवरुख (रत्नागिरी): देवरुखजवळील पुर्ये तर्फे देवळे गावातील नळ पाणीपुरवठा योजना सलग सात दिवस बंद राहिल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. गेल्या बुधवारपासून गावातील ओझरवाडी, घडशीवाडी, बौद्धवाडी आणि जांभवाडी या चार प्रमुख वाड्यांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. याच कालावधीत गावात अनुसुया विधी हा धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याने नागरिकांना पाण्याची तीव्र गरज भासत होती, परंतु पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचे हाल झाले.
ग्रामसेवक आणि ग्रामस्थांमधील संवाद व टँकरची मागणी
पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर शनिवारी संतोष पांगळे यांनी ग्रामसेवक विशाल कांबळे यांच्याशी थेट चर्चा केली. पाणीपुरवठा करणारी मशीन बंद असल्याने ती दुरुस्त होईपर्यंत किमान टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्यावेळी टँकरची सुविधा उपलब्ध करून देता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार व पाठपुरावा
टँकरची सोय न झाल्याने देवेंद्र काबदुले, भूपाल काबदुले, रवींद्र ठाकर व सुरेश गोरुले यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या पाणीप्रश्नाबाबत लेखी तक्रार निवेदन दिले. या पाठपुराव्यात वसंत भोवड, यशवंत भोवड, अक्षय भोवड, संतोष भोवड, मंगेश गोरुले, संजय चिले यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद व कारवाईचा इशारा
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत जाऊन पुढील पाठपुरावा केला. तेथे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ग्रामसेवकांनी लवकरात लवकर पाण्याच्या मशीनचे नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. यानंतर ग्रामसेवकांशी चर्चा झाली आणि शेवटी ग्रामपंचायतीमार्फत टँकरची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती भूपाल काबदुले यांनी दिली.
ग्रामस्थांचे सवाल आणि आगामी ग्रामसभेतील प्रस्ताव
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर लगेच टँकरची व्यवस्था कशी झाली, मग याआधी ही सुविधा का उपलब्ध करून दिली गेली नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थ आता विचारत आहेत. तसेच ग्रामसेवकांचा दूरध्वनी काही दिवस बंद असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. पाणीपुरवठा बंद राहिलेल्या कालावधीतील जास्तीत जास्त ६ महिन्यांपर्यंतची पाण्याची बिले ग्रामसेवकांनी स्वतःच्या खिशातून भरावीत, असा प्रस्ताव आगामी ग्रामसभेत मांडण्यात येणार असून, याबाबत नियमानुसार अधिकृत ठराव घेण्याची मागणी करणार असल्याचे काबदुले यांनी स्पष्ट केले.













