Nitesh Rane Cabinet Committee: दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणेंचा समावेश

Nitesh Rane Cabinet Committee: दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणेंचा समावेश

उपसमिती झाली ११ सदस्यांची

रत्नागिरी : Nitesh Rane Cabinet Committee च्या रचनेत मोठा बदल करण्यात आला असून, अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवरील उपाययोजनांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत आता राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने २९ सप्टेंबर रोजी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या नव्या निर्णयामुळे आता दुष्काळजन्य परिस्थितीच्या आढाव्यात मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध महत्त्वाच्या बाबींचा थेट समावेश केला जाणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये सुरुवातीला १० मंत्री आणि मुख्य सचिव यांचा समावेश होता. यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि सदस्य सचिव म्हणून मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा समावेश होता. मंगळवारी झालेल्या नव्या निर्णयानुसार आता या उपसमितीत एकूण ११ मंत्री आणि मुख्य सचिव अशी रचना झाली असून ना. नितेश राणे यांचा समावेश करण्यात आला आहे.

मंत्री नितेश राणे यांनी नुकताच राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून तेथील मत्स्य व्यवसाय व उत्पादनावर झालेल्या परिणामांचा सविस्तर आढावा घेतला होता. दुष्काळ ट्रिगर-१ अंतर्गत येणाऱ्या मत्स्य व्यवसायाशी संबंधित तलाव, जलाशय व इतर ठिकाणांची त्यांनी थेट पाहणी करून तेथील समस्या समजून घेतल्या होत्या. कोकणातही दुष्काळ ट्रिगर-१ चे परिणाम दिसून आले असून राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमध्ये कोकणातील तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Gadre1

यामध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर व राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड व वेंगुर्ला या तालुक्यांना प्रथम कळ लागू झाली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ना. नितेश राणे यांची मंत्रिमंडळ उपसमितीमधील निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.