मूर-तांबळवाडीतील ग्रामस्थांनी उचलले सामाजिक परिवर्तनाचे पाऊल; पतीच्या निधनानंतर अलंकार उतरवणे व कुंकू पुसण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद
राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मूर-तांबळवाडी येथील ग्रामस्थांनी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे आणि पुरोगामी पाऊल उचलले आहे. वाडीमध्ये पूर्वापार चालत आलेली अमानुष विधवा प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी आयोजित एका विशेष बैठकीत एकमुखाने घेतला आहे.
मानसिक वेदना थांबवण्यासाठी बैठकीत सर्वानुमते निर्णय
पतीच्या निधनाचे दुःखाश्रू सुकण्याआधीच संबंधित महिलेवर तिच्या सौभाग्याच्या खुणा काढून घेण्याची दुर्दैवी प्रक्रिया केली जाते. यात महिलेचे अलंकार उतरवणे आणि कुंकू पुसणे यांसारख्या अनिष्ट प्रथांमुळे तिला तीव्र मानसिक वेदनेतून जावे लागते. ही प्रथा काळाच्या ओघात बदलणे अत्यंत गरजेचे असल्याचे ओळखून मूर-तांबळवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत ही प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि यापुढे ती न पाळण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला.

प्रमुख उपस्थिती आणि सामाजिक पाठबळ
सामाजिक समतेचा आणि स्त्रीसन्मानाचा हा ऐतिहासिक निर्णय घेताना गावातील व मंडळातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या बैठकीस मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बारगोडे, प्रकाश यद्रुक, सचिव विलास पवार, तसेच विजय बने, राजेश बने, विजय पवार आणि रघुनाथ गुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सर्व ग्रामस्थांनी या पुरोगामी निर्णयाचे स्वागत करत गावातील सर्व महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.













