आगामी सण-उत्सव साधेपणाने साजरे करा; वाचलेला निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचे शिंदेंचे शिवसेनेला व जनतेला आवाहन
मुंबई : महाराष्ट्रात यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे उद्भवलेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत संवेदनशील पोस्ट शेअर केली आहे. "राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे!" असे सांगत त्यांनी आगामी नवरात्रोत्सव आणि इतर सर्व सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे न करता साधेपणाने साजरे करावेत, तसेच या उत्सवांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी द्यावा, असे नम्र आवाहन केले आहे.
यंदा पावसाचा दगा; ७५ टक्के महाराष्ट्रात दुष्काळ
महाराष्ट्रात यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम हातातून गेला असून रब्बी हंगामावरही मोठे संकट ओढावले आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील ७५ टक्के भागामध्ये म्हणजेच सुमारे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, चाऱ्याची सोय, मोफत अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

‘उत्सवांचा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी द्या’ – एकनाथ शिंदे
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "यंदा निसर्गाचा प्रकोप झाला, पिके करपली आणि आमचा अन्नदाता बळीराजा अडचणीत आला आहे. अशा कठीण प्रसंगी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सर्वांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे."
पुढे आवाहन करताना ते म्हणाले, "शेतकरी चिंताक्रांत असताना सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक संस्थांनी आणि राज्यातील जनतेने नवरात्रोत्सव व पुढील काळातील सर्व कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करावेत. उत्सवांचा वाचलेला निधी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी द्यावा. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हीच खरी जगदंबेची सेवा ठरेल."













