झारणीरोड परिसरात पोलिसांची तत्परता; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच संशयितावर कारवाई
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील झारणीरोड परिसरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान बाटली फेकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सागर चक्रधर दळी (वय ४५, रा. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान अचानक आली बाटली
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शहरातील झारणीरोड येथून एक घरगुती गणपती विसर्जन मिरवणूक वाजत-गाजत शांततेत चालली होती. मिरवणूक पुढे जात असताना अचानक एका दिशेने मिरवणुकीच्या मार्गावर काचेची बाटली येऊन पडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मिरवणुकीत सहभागी नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शहर पोलिसांची तत्परता; अनर्थ टळला
घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात येताच, घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि याप्रकरणी संशयित तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले. सागर चक्रधर दळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.













