Krida e Pramaan Portal Ratnagiri News: खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली लागू; रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

Krida e Pramaan Portal Ratnagiri News: खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी 'क्रीडा ई-प्रमाण' प्रणाली लागू; रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

ब्लॉकचेन व AI तंत्रज्ञानाद्वारे होणार क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी; आधार-संलग्न नोंदणीद्वारे बोगस प्रमाणपत्रांना बसणार आळा

रत्नागिरी : शासनाच्या नवीन क्रीडा धोरणांतर्गत गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के थेट आरक्षणाचा लाभ पारदर्शक आणि त्रुटीमुक्त पद्धतीने देण्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ (Krida e-Pramaan) ही ब्लॉकचेन (Blockchain) आणि एआय (AI) वर आधारित अत्याधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे खेळाडूंची होणारी फसवणूक टळणार असून प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया गतिमान होणार आहे.

क्रीडा संघटनांसाठी ७ दिवसांची मुदत अनिवार्य

नवीन नियमांनुसार, मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांनी कोणतीही स्पर्धा संपल्यापासून ७ दिवसांच्या आत सहभागी व विजेत्या खेळाडूंची यादी तसेच निकाल .xlsx फाइल स्वरूपात या पोर्टलवर डिजिटल स्वाक्षरीसह (Digital Signature) अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ठराविक मुदतीत माहिती न दिल्यास खेळाडूंच्या होणाऱ्या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित क्रीडा संघटनेची राहील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

Ronic

खेळाडूंना आधार-संलग्न ओळख क्रमांकाद्वारे नोंदणी

या नवीन डिजिटल व्यवस्थेमुळे खेळाडूंना आता कागदपत्रे घेऊन विभागीय किंवा जिल्हा क्रीडा कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही. खेळाडूंनी स्वतः https://sports.maharashtra.gov.in किंवा https://kridaepramaan.org/register या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या आधार-संलग्न ओळख क्रमांकाद्वारे (Aadhaar Linked ID) ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

बोगस प्रमाणपत्रांना आळा; ८ जानेवारी २०२६ चा शासन निर्णय

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बोगस व बनावट क्रीडा प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसणार आहे. प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित (Automated) आणि अत्यंत पारदर्शक होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने ८ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

या योजनेचा आणि प्रणालीचा जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी व क्रीडा संघटनांनी लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.