नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पोर्टल निर्मितीच्या सूचना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात घनकचरा व्यवस्थापनाचा तारीखनिहाय अहवाल सादर करण्याबरोबरच या कामात संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी एक सुसज्ज ‘सेंट्रलाइज पोर्टल’ (Centralized Portal) विकसित करण्याची सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे.
विशेष कक्षाच्या आढावा बैठकीत सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांना आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर तारीखनिहाय अहवाल आणि छायाचित्रे तातडीने सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

MPCB विकसित करणार ‘सेंट्रलाइज पोर्टल’
कचरा व्यवस्थापनाच्या कामांमध्ये गतिमानता आणि अचूकता राहावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) एक मध्यवर्ती डिजिटल पोर्टल विकसित करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जिंदल यांनी केली. या पोर्टलवर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि नगरपंचायतींनी केलेल्या कचरा संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया कामांची नियमित नोंद ठेवली जाईल. यामुळे वरिष्ठ स्तरावरून कामाचा थेट व पारदर्शक आढावा घेणे शक्य होणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
ग्रामीण ते नागरी भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचरा व्यवस्थापनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी नियम मोडणाऱ्या घटकांवर कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव गारवे यांनी आपापल्या क्षेत्रातील उपायांची माहिती दिली. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट आणि MPCB चे उपप्रादेशिक अधिकारी संदीप टोपे उपस्थित होते.













