मोबाईल, टीव्हीसह सोन्याच्या दुकानावर मारला डल्ला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भामट्याचा शोध सुरू
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात महागड्या वस्तू खरेदी करून दुकानदारांना चक्क बनावट व खोटे चेक देऊन फसवणूक करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका नामांकित शोरूममधून तब्बल ६६ हजार ५०० रुपयांचे बनावट चेक देऊन मोबाईल फोन लांबवल्यानंतर, संबंधित इसमाने शहरातील एका सराफालाही अशाच प्रकारे गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. बँकेत हे चेक तपासणीसाठी पाठवले असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी फसवणूक झालेल्या दुकानदाराने रत्नागिरी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे.
मोबाईल सोबत नेला, टीव्ही घरी पाठवण्याची बतावणी :
संबंधित भामट्याने खरेदीला येण्याच्या एक दिवस आधी शोरूममध्ये फोन करून टीव्हीची सविस्तर चौकशी केली होती. दुसऱ्या दिवशी दुकानात प्रत्यक्ष येऊन त्याने टीव्ही व मोबाईल फोनची खरेदी केली. खरेदी केलेल्या एकूण ६६ हजार ५०० रुपयांच्या बिलापोटी त्याने बँकेचा चेक दिला. "टीव्ही माझ्या पाली येथील घरी पाठवून द्या, मोबाईल मी सोबत घेऊन जातो" अशी बतावणी या ‘नवाथे’ नामक ग्राहकाने केली. दुकानदाराने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ४९ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल फोन त्याच्या स्वाधीन केला, तर १८ हजार रुपये किमतीचा टीव्ही घरी पाठवण्याचे ठरले.

बँकेत चेक स्कॅनच होईना; बनावट प्रिंट असल्याचे उघड :
दुकानदाराने सदर चेक बँकेत जमा केल्यानंतर, चेक स्कॅन होत नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. अधिक पडताळणी केली असता, हा चेक मूळ बँकेचा नसून त्याची केवळ हुबेहूब प्रिंट काढलेली असल्याचे आणि तो पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
सोनारालाही ९ हजारांना फसविले :
दुकानदाराने बँकेत अधिक चौकशी केली असता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. कालच शहरातील एका नामांकित सराफाने याच इसमाचा चेक क्लिअरिंगसाठी बँकेत पाठवला होता. तो चेकही स्कॅन न झाल्याने बँकेने परत पाठवला होता. चौकशीअंती या नवाथे नामक इसमाने त्या सोनाराकडूनही ९ हजार रुपयांचा चांदीचा दिवा अशाच बनावट चेकद्वारे खरेदी केल्याची माहिती समोर आली.
दुसऱ्या दुकानात सतर्कतेमुळे निभावले; लांजातही गंडा घातल्याची चर्चा :
टीव्ही व मोबाईल खरेदी केल्यानंतर या भामट्याने शहरातील आणखी एका दुकानात जाऊन चेक देऊन वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संबंधित दुकानदाराने "चेक खात्यात क्लिअर झाल्याशिवाय आम्ही वस्तू देणार नाही" अशी ठाम भूमिका घेतल्याने तो इसम तेथून काढता पाय घेत परत फिरला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच इसमाने अशाच पद्धतीने लांजा येथील एका व्यापाऱ्यालाही लाखोंचा चुना लावल्याची जोरदार चर्चा व्यापारी वर्गात सुरू आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कसून तपास :
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकानदाराने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. बँक कर्मचाऱ्यांनीही अशा बनावट प्रिंट केलेल्या चेकपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून या सराईत भामट्याचा कसून शोध सुरू केला आहे. व्यापाऱ्यांनी अनोळखी ग्राहकांकडून चेक स्वीकारताना पूर्ण दक्षता घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.













