जिल्ह्यात १२०० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण; उर्वरित क्षेत्राचे पंचनामे युद्धपातळीवर करून तातडीने मदत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
रत्नागिरी : Ratnagiri Crop Damage मुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी प्रत्यक्ष शेतावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यात पावसाने फिरवलेली पाठ आणि ऐन हंगामात पडलेल्या रणरणत्या उन्हामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे गावातील कातळवाडी तसेच डुगवे परिसरातील शेतांमध्ये जाऊन त्यांनी शेंडे करपलेल्या आणि पोकळ दाणा भरलेल्या भातपिकांची पाहणी केली व स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंत सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित सर्व गावांमधील बाधित पिकांचे पंचनामे स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी यंत्रणेमार्फत येत्या एक ते दोन आठवड्यांत युद्धपातळीवर पूर्ण केले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल तत्काळ शासनाकडे सादर करून नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कातळवाडी येथे पाहणीदरम्यान स्थानिक शेतकरी चंद्रकांत फुटक, कृष्णा फुटक, सदाशिव फुटक, अनिल भाटकर, मोहन फुटक आणि सुभाष भुवड यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. जुलै आणि विशेषतः सप्टेंबर महिन्यात आवश्यक असलेला पाऊस गायब राहिल्याने वरून पीक हिरवे दिसत असले, तरी पोटऱ्यांमध्ये दाणा भरलेला नसून ते पूर्णपणे पोकळ व चिंब झाले आहे. सामान्यतः रोपांना १२ ते १८ फुटवे येतात, परंतु पाण्याच्या अभावामुळे सध्या केवळ ५ ते ७ फुटवे आले आहेत. तसेच कडा करपा, काजळी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने भातशेती पूर्णतः संकटात सापडली आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी अशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, त्याचीच पुनरावृत्ती यावर्षी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पंचनामे आणि ई-पीक पाहणी प्रक्रियेला गती देण्यासाठी नेटवर्कची अडचण असल्यास उपलब्ध कनेक्शन वापरावे किंवा ॲपमध्ये ऑफलाइन डेटा नोंदवून नंतर कव्हरेजमध्ये आल्यावर अपलोड करावा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना शासकीय योजना व मदतीचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक असल्याने सहायक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उर्वरित सर्व बाधित क्षेत्राचे १०० टक्के पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी महसूल व कृषी विभागाला दिले आहेत.
या पाहणीवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी सागर मासाळ, उप कृषी अधिकारी श्री. कोकणे, सहायक कृषी अधिकारी अजय कल्याणकर, महसूल ग्राम अधिकारी सरस्वती वाघमोडे आणि माजी सरपंच प्रतीक्षा पालवकर आदी उपस्थित होते.
Ratnagiri Crop Damage नंतर आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावाचे ‘वॉटर बजेटिंग’ (पाणी अंदाजपत्रक) तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू नये, म्हणून ऑक्टोबर महिन्यातच टंचाई आराखडा तयार करण्यास ग्रामसेवकांना सांगण्यात आले आहे. गावातील पाण्याच्या स्रोतांचा शोध घेऊन गरज भासल्यास शेतकऱ्यांसाठी विंधण विहिरी उपलब्ध करून देण्याचे नियोजनही प्रशासनाकडून केले जाणार आहे.













