अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध; Ratnagiri Voter Revision 2026 मोहिमेअंतर्गत ‘Unmapped’ मतदारांना मोठा दिलासा
रत्नागिरी : Ratnagiri Voter Revision 2026 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून जिल्ह्यातील पात्र नागरिकांना आणि नवमतदारांना नाव नोंदवण्याची तसेच दुरुस्तीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून, सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी आता १६ नोव्हेंबर २०२६ रोजी केली जाणार आहे.
सुधारित पुनरीक्षण कार्यक्रमानुसार ३१ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील. नोटीस कालावधी आणि प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण केला जाईल. त्यानंतर अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ ला प्रसिद्ध होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवमतदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नोंदणी निश्चित करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अधिकाधिक पात्र नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर चार दिवस विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दिनांक ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ या चार दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) संबंधित केंद्रांवर प्रत्यक्ष उपस्थित राहतील. या शिबिरांमध्ये नवमतदारांची नावनोंदणी, प्रारुप यादीतील नावांची पडताळणी तसेच दुरुस्तीचे अर्ज भरून घेण्याचे काम प्रत्यक्ष पार पडणार आहे.

प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीनंतर ज्या मतदारांना ‘Unmapped’ व ‘Logical Discrepancy’ या कारणांसाठी सुनावणीच्या नोटिसा प्राप्त झाल्या आहेत, अशा मतदारांना प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात हजर राहण्याची आवश्यकता नाही, असा मोठा दिलासा प्रशासनाने दिला आहे. बीएलओ स्वतः अशा मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक ती कागदपत्रे गोळा करतील. याशिवाय मतदारांना ऑनलाइन किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही आपली कागदपत्रे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
केवळ अपवादात्मक स्थितीत उपलब्ध संवाद माध्यमांचा वापर करून ऑनलाइन सुनावणी घेतली जाईल आणि त्यासाठी मतदार स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकते. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या सुधारित संधीचा लाभ घ्यावा आणि ही मोहीम यशस्वी करण्यासाठी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.













