Raigad Diveagar Drowning: रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; पर्यटनासाठी आलेले आळंदीचे आठ विद्यार्थी पाण्यात बुडून ठार

Raigad Diveagar Drowning: रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; पर्यटनासाठी आलेले आळंदीचे आठ विद्यार्थी पाण्यात बुडून ठार

पाण्याचा अंदाज न आल्याने अकरावीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; सर्व ८ मृतदेह बाहेर काढले

कोकणातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने झेप घेतली आहे. समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ८ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून ते बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत.

मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पुण्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खाजगी शिकवणी वर्गाचे विद्यार्थी आणि शिक्षक सहलीसाठी रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे आले होते. या सहलीमध्ये ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक असे एकूण ४४ जण सहभागी झाले होते. अकरावीच्या वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटत असताना काही जण समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने ८ विद्यार्थी अचानक पाण्यात ओढले गेले आणि बुडाले, अशी माहिती आळंदी नगरपरिषदेकडून देण्यात आली.

दुर्घटना घडताच स्थानिक नागरिकांनी आणि महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे निसर्गरम्य दिवेआगर किनाऱ्यावर एकाएकी भीषण शांतता पसरली आहे.

Ratnagiri Khabardar add image

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. सर्व मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.