Ratnagiri Rojgar Mahakumbh: रत्नागिरीत ‘रोजगार महाकुंभ’; एकाच दिवशी १७२ तरुणांना मिळाली रोजगाराची संधी

Ratnagiri Rojgar Mahakumbh: रत्नागिरीत 'रोजगार महाकुंभ'; एकाच दिवशी १७२ तरुणांना मिळाली रोजगाराची संधी

जिल्हाभरात १४ ठिकाणी रोजगार मेळावे; ४३३ उमेदवारांची प्राथमिक फेरीत निवड

Ratnagiri Rojgar Mahakumbh उपक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील सुशिक्षित आणि कुशल बेरोजगार तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत १ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात विशेष ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला होता. या अभियानांतर्गत एकाच दिवशी १४ विविध केंद्रांवर भव्य रोजगार मेळावे पार पडले, ज्यामध्ये नामवंत कंपन्यांमार्फत १७२ पात्र उमेदवारांची अंतिम निवड करून त्यांना थेट नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

या भव्य रोजगार महाकुंभाचे मुख्य उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते स्थानिक गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात उत्साहात पार पडले. जिल्ह्यातील स्थानिक सुशिक्षित, कुशल व अर्धकुशल तरुणांना त्यांच्याच जिल्ह्यात रोजगाराची हक्काची संधी उपलब्ध व्हावी आणि स्थानिक उद्योगांना योग्य मनुष्यबळ मिळावे, या दुहेरी उद्देशाने जिल्हा प्रशासनाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

जिल्ह्यातील १४ केंद्रांवर पार पडलेल्या या मेळाव्यांमध्ये एकूण १११ लहान-मोठे उद्योजक व नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यात एकूण २,६१२ विविध पदांसाठी तब्बल १,६४० उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. या मुलाखतींच्या प्राथमिक फेरीत ४३३ उमेदवारांची निवड झाली, तर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १७२ उमेदवारांना अंतिम निवडीनंतर जागेवरच नियुक्तीपत्रे देऊन रोजगाराची संधी देण्यात आली.

Baguass

स्थानिक पातळीवरच मोठ्या कंपन्यांमध्ये मुलाखती देण्याची आणि थेट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्याने सहभागी तरुणांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी दिली.