Dino Morea Arrested: बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक; ८ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांची मोठी कारवाई

Dino Morea Arrested: बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक; ८ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांची मोठी कारवाई

चित्रपटसृष्टीत एकच खळबळ

Dino Morea Arrested: बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुंबईतील बहुचर्चित मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी (Mithi River Irregularities Case) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) २ ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई करत अभिनेता दिनो मोरिया याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात सुमारे आठ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्याला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली.

मिठी नदीतील गाळ उपसा आणि साफसफाईच्या कामात मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कंत्राटात झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक अफरातफरीच्या तपासादरम्यान दिनो मोरियाचे नाव पुढे आले होते. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम याच्या कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांच्या विश्लेषणादरम्यान आरोपीने दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांच्याशी अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांमध्ये मित्रत्वाचे संबंध असण्यासोबतच मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘स्लज पुशर्स’ आणि ‘ड्रेजिंग मशीन्स’चा वापर करून मिठी नदी साफ करण्यासाठी कंत्राट दिले होते. यामध्ये टेंडर प्रक्रियेत छेडछाड करून ठराविक पुरवठादारांना फायदा मिळवून देत ६५ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांसह एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी या प्रकरणात दिनो मोरियाला ‘ईडी’च्या (ED) चौकशीलाही सामोरे जावे लागले होते, तसेच त्याच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

Gadre2

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिनो मोरियाने ‘राज’ चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अलिकडेच तो ‘द एम्पायर’ वेब सीरिज आणि अक्षय कुमारसोबत ‘हाउसफुल ५’ मध्ये झळकला होता. दिशा सालियान प्रकरणातही नाव चर्चेत आलेला दिनो मोरिया आता मिठी नदी घोटाळ्यात थेट अटक झाल्यामुळे अडचणीत सापडला असून, पोलीस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत.