Sangameshwar Dhamani Shop Burglary: धामणीत चार दुकाने फोडली; सीसीटीव्ही फोडून चोरीचा प्रयत्न, संशयित कॅमेऱ्यात कैद

Sangameshwar Dhamani Shop Burglary: धामणीत चार दुकाने फोडली; सीसीटीव्ही फोडून चोरीचा प्रयत्न, संशयित कॅमेऱ्यात कैद

ग्रामस्थांनी पाठलाग करून संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले; सावर्डे येथील चोरीशी संबंध असल्याचा संशय

Sangameshwar Dhamani Shop Burglary च्या घटनेमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी आणि सावर्डे परिसरात व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. धामणी येथे बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच रांगेतील चार दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी बाहेरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा फोडला; मात्र दुकानातील दुसऱ्या कॅमेऱ्यात संशयित चोरटा कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धामणी येथे भालचंद्र सप्रे यांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांमध्ये मेडिकल, किराणा आणि हार्डवेअरची दुकाने आहेत. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी बाहेरील कॅमेऱ्याची तोडफोड केली आणि चार दुकानांची शटर उचकटून आत प्रवेश केला. प्राथमिक माहितीनुसार मेडिकल दुकानातील रोख रक्कम चोरीला गेली आहे. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

दरम्यान, लगतच्या तुरळ परिसरात काही संशयित व्यक्ती वाहनांना ‘ग्रीस लावून देण्याच्या’ बहाण्याने फिरताना आढळल्या. त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून सतर्क ग्रामस्थांनी पाठलाग करत काही जणांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या पकडलेल्या संशयितांची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Arihant 4

विशेष म्हणजे, ज्या रात्री धामणीत हा प्रकार घडला त्याच रात्री सावर्डे येथे महामार्गालगत असलेल्या एका ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाचे शटर फोडून १ लाख ४० हजार रुपयांचा माल लांबवण्यात आला. त्यामुळे महामार्गालगतची दुकाने लक्ष्य करणारी एखादी फिरती आंतरजिल्हा चोरट्यांची टोळी सक्रिय असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन्ही चोऱ्यांचा छडा लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.