Yuzvendra Chahal Retirement: लेग-स्पिनर युझवेंद्र चहलची प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती; कसोटी खेळण्याचे स्वप्न अधुरे

Yuzvendra Chahal Retirement: लेग-स्पिनर युझवेंद्र चहलची प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती; कसोटी खेळण्याचे स्वप्न अधुरे

रेड बॉल क्रिकेटला अलविदा करताना चहलची भावूक पोस्ट; मर्यादित षटकांत पुनरागमनाची आशा कायम

Yuzvendra Chahal Retirement: भारताचा स्टार लेग-स्पिनर युझवेंद्र चहल याने प्रथम-श्रेणी (First-Class) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. लाल चेंडूच्या क्रिकेटला अलविदा करताना चहलने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. भारतीय कसोटी संघात स्थान मिळवणे हे त्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते, मात्र हे स्वप्न अधुरे राहिल्याची खंत त्याने व्यक्त केली.

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये चहलने लिहिले की, "रेड बॉल क्रिकेट हे केवळ एक फॉरमॅट नव्हते, तर त्याने मला संयम, चारित्र्य आणि कठीण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता शिकवली. भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे हे माझे कायम स्वप्न होते, परंतु दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही." चहलने आपला शेवटचा प्रथम-श्रेणी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला, ज्याचा उल्लेख करताना तो अत्यंत भावूक झाला.

प्रथम-श्रेणी क्रिकेटला रामराम ठोकला असला तरी चहलने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतलेली नाही. भारतासाठी एकदिवसीय (ODI) आणि टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची त्याची इच्छा आणि भूक अजूनही कायम आहे. देशासाठी पुन्हा निळ्या जर्सीमध्ये खेळण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

Infigo Eyecare

युझवेंद्र चहलने २००९ मध्ये हरियाणाकडून प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ४९ सामन्यांत ३२.२७ च्या सरासरीने १४८ विकेट्स घेतल्या आहेत. नुकताच तो नॉर्थम्प्टनशायरकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळला होता, जिथे त्याने २१ बळी टिपले. भारतासाठी त्याने ७२ वनडे आणि ८० टी-२० सामने खेळले असून आयपीएलच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. सध्या पंजाब किंग्जकडून खेळणारा चहल आगामी काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे.