४ ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा ‘गर्जना’ मोर्चा
Gyanesh Kumar Resignation Protests: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात मतभेद समोर आल्यानंतर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी आंदोलन छेडले असून, शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) मुंबई आणि दिल्लीत आंदोलनाची हाक दिली. मात्र, दिल्लीत आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई करत आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सकाळी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीने बसमध्ये भरल्याने घटनास्थळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बसमधूनच आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी घराबाहेर आणि घटनास्थळी नाकेबंदी केली," असा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला.
दुसरीकडे, मुंबईत शिवाजी पार्क परिसरात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली दुपारी आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अद्याप अधिकृत परवानगी दिलेली नाही. या आंदोलनानंतर येत्या ४ ऑक्टोबर रोजी ठाकरे बंधूंनी (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भायखळा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत भव्य ‘गर्जना’ मोर्चाचे आयोजन केले आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपने या आंदोलनांवर जोरदार पलटवार केला आहे. "हे आंदोलन नसून केवळ राजकीय फायद्यासाठी सुरू असलेली स्टंटबाजी आहे," अशी घणाघाती टीका भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केली. निवडणूक आयोगातील वाद आणि त्यावरून सुरू झालेल्या या आंदोलनांमुळे आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.













