रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक; प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक; प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर

१३ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याची मुदत; २६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी (आरडीसीसी) या बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा कोकण विभागाचे विभागीय सहनिबंधक आदिनाथ दगडे यांनी ही जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. या निवडणुकीसाठी १ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचा अधिकृत कार्यक्रम :

१) प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : १ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ११:०० वाजता) २) प्रारूप मतदार यादीवर आक्षेप सादर करण्याची मुदत : १ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ३) प्राप्त आक्षेपांवर निर्णय देण्याचा अंतिम दिनांक : २२ ऑक्टोबर २०२६ ४) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक : २६ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ११:०० वाजता)

Ratnagiri Khabardar add image

येथे पाहता येईल प्रारूप व अंतिम मतदार यादी :

सदर प्रारूप व अंतिम मतदार यादी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, नवी मुंबई येथील विभागीय सहनिबंधक कार्यालय (कक्ष क्र. ३०८, कोकण भवन), जिल्हा उपनिबंधक कार्यालय रत्नागिरी, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालये, सर्व सहाय्यक निबंधक कार्यालये, तसेच आरडीसीसी बँकेचे मुख्यालय व सर्व तालुका शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या (scea.maharashtra.gov.in) आणि जिल्हा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (ratnagiridccb.bank.in) देखील ही यादी पाहता येईल.

आक्षेप नोंदवण्यासाठी नियम व अटी :

प्रारूप मतदार यादीवर ज्यांना आक्षेप नोंदवायचे आहेत, त्यांनी आपले आक्षेप १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग (कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई) यांच्या कार्यालयात समक्ष अथवा टपालाने सादर करावेत. तसेच djrkkn@gmail.com या अधिकृत ई-मेलवरही आक्षेप पाठवता येतील. १३ ऑक्टोबरनंतर येणाऱ्या कोणत्याही आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप आणि ई-मेलवर मिळणार सुनावणीची नोटीस :

आक्षेप सादर करणाऱ्यांनी आपल्या अर्जात स्वतःचा ई-मेल आयडी आणि व्हॉट्सॲप क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. आक्षेपावरील सुनावणीची नोटीस स्पीड पोस्टासह संबंधितांच्या ई-मेल आणि व्हॉट्सॲपवर पाठवली जाईल. टपालाने नोटीस मिळण्यास विलंब झाल्यास व्हॉट्सॲप व ई-मेलवर आलेली नोटीस हीच अधिकृत मानून संबंधितांनी सुनावणीस दिलेल्या दिनांकास व वेळेस वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आदिनाथ दगडे यांनी केले आहे.