खेड पालिकेचा पाणीपट्टी थकबाकीदारांना मोठा दणका; ८५ हून अधिक नळजोडण्या केल्या खंडित

खेड पालिकेचा पाणीपट्टी थकबाकीदारांना मोठा दणका; ८५ हून अधिक नळजोडण्या केल्या खंडित

सुमारे १५ लाखांची वसुली करण्यात यश; मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू

खेड : शहरातील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी खेड नगरपरिषदेने अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. वारंवार सूचना देऊनही पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत पालिकेने आतापर्यंत तब्बल ८५ हून अधिक जणांच्या नळजोडण्या खंडित केल्या आहेत. नगरपरिषदेच्या या धडक कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सुमारे ४५ ते ५० लाख रुपयांच्या एकूण थकबाकीपैकी १२ ते १५ लाख रुपयांची तातडीची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

दीड हजारांहून अधिक नळधारक; लाखोंची पाणीपट्टी थकीत :

खेड शहरामध्ये सध्या १ हजार ५०० हून अधिक निवासी आणि व्यावसायिक नळधारक आहेत. यातील अनेक ग्राहकांकडे गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे. नगरपरिषद प्रशासनाने थकबाकी भरण्यासाठी वेळोवेळी जाहीर आवाहने केली, प्रत्यक्ष नोटिसा बजावल्या आणि पुरेसा कालावधीही दिला. मात्र, तरीही थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर प्रशासनाने थेट नळजोडणी तोडण्याचा कठोर पवित्रा घेतला.

Aayurzil

मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने पाणीपुरवठा विभागाची धडक कारवाई :

खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागाच्या विशेष पथकाने शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरून ही धडक मोहीम राबवली. पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन ८५ हून अधिक थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित केले. या कारवाईनंतर अनेक नळधारकांनी धावपळ करत पालिकेत थकबाकी जमा करण्यास सुरुवात केली आहे.

थकबाकी न भरल्यास कारवाई आणखी तीव्र होणार :

नगरपरिषदेने आतापर्यंत केलेल्या कारवाईतून १२ ते १५ लाख रुपयांचा महसूल वसूल केला असला, तरी उर्वरित थकबाकी वसुलीसाठी ही मोहीम यापुढेही अविरत सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी सर्व निवासी व व्यावसायिक नळधारकांनी आपल्याकडील थकीत पाणीपट्टीची रक्कम तात्काळ नगरपालिकेत जमा करून सहकार्य करावे, अन्यथा नळजोडण्या खंडित केल्या जातील, असा सक्त इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.