दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरातील घटना; बेकायदेशीर शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दापोली :
दापोली तालुक्यातील दाभोळ नजीकच्या वणौशी-खोंडारण जंगलात शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर काळाने भीषण घाला घातला आहे. जंगलात दबा धरून बसले असताना गावठी बंदुकीतून अचानक झालेल्या मिसफायरमुळे गोळीचे छर्रे लागून एकाचा जागीच दुर्दैवी अंत झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत सचिन शांताराम शिगवण (वय ४४, रा. खोंडारण खालचीवाडी) यांचा मृत्यू झाला असून, सुनील पांदले (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सावजाची वाट पाहत असताना घडला घात :

दाभोळ पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन शिगवण आणि सुनील पांदले हे दोघे ३० सप्टेंबरच्या रात्रीच्या सुमारास सिंगल बोअर गावठी बंदूक घेऊन वणौशी-खोंडारण भागातील जंगलात शिकारीसाठी गेले होते. जंगलात एका ठिकाणी ते सावजाची वाट पाहत दबा धरून बसले होते. त्याच वेळी सचिन शिगवण यांचा पाय बंदुकीला लागला आणि अचानक बंदुकीचा चाप (ट्रिगर) ओढला गेल्याने मिसफायर झाला.
स्वतःच्याच शरीरात घुसले छर्रे :
बंदुकीतून सुटलेले सुमारे पाच ते सहा छर्रे थेट सचिन शिगवण यांच्या पोटात व छातीत घुसल्याने त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारीच बसलेले सुनील पांदले यांच्या मांडीत व पायात गोळीचे छर्रे घुसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि वेदनेने तेथेच बेशुद्ध झाले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर पांदले यांनी मोबाईलवरून गावातील मित्रांना या भीषण घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी सुनील पांदले यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दाभोळ सागरी पोलिसांकडून तपास सुरू :
घटनेची माहिती मिळताच दाभोळ सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि जंगलातून ती गावठी बंदूक जप्त केली आहे. मृत सचिन शिगवण हे रिक्षाचालक होते, त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. जखमी सुनील पांदले हे मजुरीचे काम करतात. ही बंदूक कोणाची होती, ती अधिकृत होती का, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत.
बेकायदेशीर शिकारीचा प्रश्न पुन्हा गंभीर :
या दुर्दैवी घटनेमुळे दाभोळ आणि खोंडारण परिसरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या बेकायदेशीर शिकारीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही खोंडारण वाडी परिसरात शिकारीदरम्यान बंदुकीची गोळी लागून एका तरुणाचा नाहक बळी गेला होता. आता पुन्हा त्याच परिसरात गावठी बंदुकीच्या मिसफायरने एकाचा जीव घेतल्यामुळे वनविभाग आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.













